मोहित पांडे  (Pudhari Photo)
पालघर

Palghar Bogus Doctor | गोवाडे येथील बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; मासवण आरोग्य केंद्राच्या कारवाईनंतर पोलिसांत गुन्हा दाखल

वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार

पुढारी वृत्तसेवा

Palghar Bogus Medical Practitioner

पालघर : गोवाडे गावात वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. मासवण प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी ( दि.२३) सकाळी छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहित पांडे (वय २४, सध्या रा. गोवाडे, मूळगाव रा. गोपीपूर, पोस्ट कडोर, राज्य उत्तरप्रदेश) असे बोगस डॉक्टरचे नाव आहे.

मोहित दिनेश पांडे हा मनोर-पालघर महामार्गावरील गोवाडे गावातील भुलानी स्टील कंपनीसमोर, चंद्रकांत पाटील यांच्या मालकीच्या गाळ्यात दवाखाना चालवत होता. तो अॅलोपॅथी औषधांचा वापर करून रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती मासवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाली होती.

माहितीच्या आधारे डॉ. वैभव अजगर यांनी बुधवारी सकाळी छापा टाकला असता, मोहित पांडे रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे वैद्यकीय पात्रतेचे प्रमाणपत्र मागितले असता, तो ते सादर करण्यात अपयशी ठरला. वैद्यकीय पात्रता किंवा शासनमान्य नोंदणी नसतानाही उपचार केल्याने, त्याने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अ‍ॅक्टचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी डॉ. वैभव अजगर यांच्या तक्रारीवरून मोहित पांडे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम ३१८(४) आणि वैद्यकीय व्यवहार अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३५, ३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अशा बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT