पालघर शहर: पालघर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणरायाचे आणि गौरींचे आगमन होणार आहे. पोलीस प्रशासनाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, यंदा जिल्ह्यात एकूण १९५१ सार्वजनिक आणि १०,६१३ खाजगी (घरगुती) अशा तब्बल १२,५६४ गणेशमूर्तींची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १६७ सार्वजनिक आणि ६७७ खाजगी अशा एकूण ८४४ ठिकाणी गौरींची स्थापना होणार आहे.
पालघर जिल्हा पोलीस दलाच्या अत्यारीत हद्दीतील वाडा, बोईसर, पालघर, डहाणू, मनोर आणि विक्रमगड या भागांमध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक १७५ सार्वजनिक गौरी आणि ११५० खाजगी गणपतींची स्थापना होणार आहे, तर बोईसर हद्दीत २३२ सार्वजनिक आणि २१२५ खाजगी गणपती विराजमान होणार आहेत.
दीड दिवसांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवासाठी आणि विसर्जन मिरवणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या, तलाव, समुद्रकिनारे आणि कृत्रिम विसर्जन घाट पूर्णपणे सज्ज करण्यात आले आहेत.
भाविकांच्या सुरक्षेसाठी विसर्जन घाटांवर पुरेशी रोषणाई, जीव रक्षक, अग्निशामक दल आणि तात्पुरत्या बोटींची व्यवस्था पालिका व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पालघर जिल्हा पोलीस दलाकडून गणेशोत्सवा दरम्यान १ अपर पोलीस अधीक्षक, ८ पोलीस उपाधीक्षक, ६८ पोलीस अधिकारी ५८४, पोलीस अमलदार, ५०० होमगार्ड, ६० वाहतूक अंमलदार, ८ स्ट्रायकिंग फोर्स, ३ दंगल नियंत्रण पथक, १ राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गणेशोत्सव आणि गौरी उत्सव हे सण शांतता सुरक्षितता आणि सामाजिक एकोपाराखून सजरा करावा, डीजेचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करून ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केले आहे.