पालघर : मानवनिर्मित वणव्यांच्या आगीत पालघर जिल्ह्यातील जंगले जळत आहेत. वणव्यांमुळे हजारो हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक होत असून आगीमुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. वणवे रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी वन विभागाकडून केला जात असलेला कोट्यवधींचा रुपयांचा खर्च वाया जात असल्याचे समोर येत आहे.वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडे कृती आराखडा नसल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून केला जात आहे.वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आणि अद्ययावत तांत्रिक साहाय्य नसल्याने जंगले जळून खाक होत आहेत.
वणवे रोखण्यासाठी जंगल क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती आणि वनपाल-वनरक्षक स्तरावरील वनकर्मचाऱ्यांना पुरेसे मनुष्यबळ तसेच अद्ययावत यांत्रिक साहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. पालघर जिल्ह्याच्या डहाणू उप वन संरक्षक कार्यालयाच्या कार्यकक्षेत सुमारे दीड ते दोन लाख हेक्टर वन क्षेत्र आहे. या जंगलात खैर, साग, शिसव सारख्या मौल्यवान झाडांसह अन्य प्रकारची झाडे आहेत.शेकडो प्रकारचे प्राणी आणि पक्षांचा नैसर्गिक अधिवास आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलाला मानवनिर्मित वणवे लागण्यास सुरुवात होते.वणव्यांमुळे मौल्यवान वनसंपदा जळून खाक होत आहे.जंगलातील गवत, कारवीच्या विविध जाती,पानफुटी,ऊक्षी,तेरडा, रानआले, रानकेळी,सापकांदा सारख्या वनस्पती जळून खाक होत आहेत.नव्याने उगवलेली रोपं जळून नष्ट होत आहेत.
आगीमुळे घुबड,रानकोंबड्या, मोर, गवतावरील कीटक,हरीण प्रजाती पैकी भेकरांसारख्या पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अडचणीत सापडल्या आहेत.वन कर्मचाऱ्यांची कमतरता व अधिकाऱ्यांची उदासीन भूमिका वणवे रोखण्याच्या अपयशामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. सद्याच्या परिस्थितीत पाचशे हेक्टर वनक्षेत्राची राखण एक वनपाल एक वनरक्षक आणि एक वन मजूर करत आहेत.वणवे विझवण्यासाठी एक पेट्रोल इंधनावर चालणार पंखा (ब्लोअर)उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकाच वेळी मोठ्या क्षेत्रातील वणवा तीन ते चार लोकांच्या मदतीने विझवणे शक्य होत नसल्याची भावना वन रक्षक व वन मजुरांकडून खाजगीत बोलून दाखवली जात आहे.
जंगला परिसरातील स्थानिक ग्रामस्थांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्याची गरज आहे. जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर वनांचे महत्त्व आणि वणव्यांमुळे मानवी जीवनावर होणाऱ्या घातक परिणामांची माहिती ग्रामस्थांना देणे.यासाठी निसर्गरक्षणासाठी कार्यरत सामाजिक संस्था आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांची मदत घेणे. वन व्यवस्थापन समित्या कार्यक्षम करणे आणि निधी उपलब्ध करून देणे.वणव्यांची माहिती वनविभागाला देण्यासाठी उपवन आणि सहाय्यक वन संरक्षक स्तरावर टोल फ्री नंबर सर्वसामान्य जनतेसाठी जाहीर करण्याची आवश्यकता आहे.