कासा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घोळ टोलनाक्याजवळ शनिवारी सकाळी मोठी कारवाई करत आठ लाख रुपयांचा सोलिव खैर जप्त करण्यात आला. ही कारवाई वनविभागाच्या गस्त पथकाने केली असून, अवैध खैर वाहतूक करणारा ट्रक (क्र. GJ 16 X 8700) ताब्यात घेण्यात आला आहे. ट्रकची तपासणी केली असता खैर लाकडाचा मोठा साठा आढळून आला.
या प्रकरणात ट्रकचालक सरफुद्दीन शेख याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर पुढील चौकशी सुरू आहे. मात्र, या तस्करीमागचा मुख्य सूत्रधार अद्याप फरारच आहे. त्यामुळे ही केवळ वाहतूक करणाऱ्यांवर मर्यादित नसून एक मोठा रॅकेट असल्याची शक्यता वनविभाग व्यक्त करत आहे.
महामार्गांवरून गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांतून मोठ्या प्रमाणात अवैध खैर लाकडाची तस्करी होत असल्याचे पुन्हा एकदा या प्रकरणातून समोर आले आहे. यामुळे वनसंपत्तीवर गंभीर धोका निर्माण झाला असून, संबंधित विभागांनी अधिक तीव्र गस्त आणि नियंत्रण यंत्रणा सक्रिय करण्याची गरज निर्माण झाली आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, खैर लाकूड हा अत्यंत मौल्यवान असून, त्याची अवैध तस्करी ही गुन्हेगारी स्वरूप धारण करत चालली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग अधिक कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच मुख्य सूत्रधारास अटक करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
ही कारवाई कासा वनपरीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल एन. ए. हिरे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जे. के. चौधरी, एम. ए. कांबळे आणि वनरक्षक आर. एस. हाडळ, वाय. पी. मोळे, के. एस. शेंडे, डी. पी. गोरे यांच्या संयुक्त पथकाने केली.तसेच यावेळी घोळ येथील ग्रामपंचायत सदस्य सुदाम कदम, सुधीर धांडा हे उपस्थित होते. या प्रकरणाचा तपास सध्या मुरबाड परिमंडळाचे वन अधिकारी एन. ए. कांबळे करीत आहेत.