money  pudhari file photo
पालघर

Palghar Flood Relief-पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा

पूरग्रस्तांच्या मदत पॅकेजमध्ये तब्बल ६८ कोटी ४० लाख रुपयांची वाढ

पुढारी वृत्तसेवा

पालघर : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून पालघर जिल्हा व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठी वाढीव नुकसानभरपाई पॅकेज मंजूर केले आहे. नुकसान भरपाईच्या पॅकेज मध्ये प्रथमच दुकानदार, फेरीवाले, पोल्ट्री शेड, बोटी आणि इतर उपजीविकेच्या साधनांच्या नुकसानीचाही समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या वाढीव भरपाईच्या प्रस्तावास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आल्याने पूरग्रस्तांना आर्थिक बळ मिळणार असून उध्वस्त झालेल्या संसार आणि व्यवसाय उभारणीसाठी हातभार लागणार आहे. विद्यमान निकषांनुसार मंजूर होणारी 12.80 कोटींची मदत वाढवून 81.22 कोटी करण्यात आल्याने 68.40 कोटींची अतिरिक्त मदत मंजूर झाली आहे. मदत व पुनर्वसन विभागामार्फत अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली द्वारे मंजूर अनुदान जिल्ह्याला उपलब्ध झाले असून वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

पूरानंतर जिल्ह्यात व्यापक क्षेत्रीय पाहण्या, पंचनामे आणि नुकसानीच्या सविस्तर मूल्यांकनाच्या आधारे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी आपत्तीची व्याप्ती आणि वाढीव आर्थिक मदतीची आवश्यकता अधोरेखित करणारा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला.

या प्रस्तावाला पालकमंत्री गणेश नाईक तसेच जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे पाठबळ लाभले. १ ते ८ जुलै २०२६ आणि २२ ते २४ जुलै २०२६ या दोन अतिवृष्टीच्या कालावधीतील नुकसानीसाठी विद्यमान निकषांनुसार अनुक्रमे ८.५३ कोटी आणि ४.२७ कोटी इतकी मदत देय होती. शासनाच्या मंजुरीनंतर ही मदत पहिल्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी ६४.०४ कोटी, तर दुसऱ्या कालावधीसाठी १७.१६ कोटी इतकी करण्यात आली आहे. या वाढीव मदतीमुळे जिल्ह्यातील पुनर्वसनाच्या कामांना मोठी गती मिळणार आहे. सुधारित मदत पॅकेजमध्ये उपजीविकेच्या नुकसानीसाठी स्वतंत्र नुकसानभरपाईचा समावेश करण्यात आला आहे.

यामुळे लहान व्यवसाय, स्वयंरोजगार तसेच रोजंदारीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना अर्थपूर्ण आर्थिक सहाय्य मिळणार आहे. १ ते ८ जुलै या अतिवृष्टीच्या कालावधीत बाधित झालेल्या ६,०६५ दुकानदारांना एकूण ₹३०.३२ कोटी इतकी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तर २२ ते २४ जुलै या अतिवृष्टीच्या कालावधीत बाधित झालेल्या २७७ दुकानदारांना एकूण ₹१.३८ कोटी इतकी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

पूरात नुकसान झालेल्या पोल्ट्री शेडसाठी पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. १ ते ८ जुलै या अतिवृष्टीच्या कालावधीत बाधित झालेल्या २ पोल्ट्री शेडसाठी एकूण दहा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. २२ ते २४ जुलै या अतिवृष्टीच्या कालावधीत बाधित झालेल्या सात पोल्ट्री शेडसाठी ३५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

फेरीवाले व तात्पुरत्या आस्थापनांनाही सहाय्य

रस्त्यावरील विक्रेता (फेरीवाला) / तात्पुरत्या आस्थापनेस दहा हजार इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. १ ते ८ जुलै या अतिवृष्टीच्या कालावधीत बाधित झालेल्या एक हजार रस्त्यावरील विक्रेत्यांना एकूण एक कोटी मदत दिली जाणार आहे.

पुरामुळे झालेले नुकसान आणि उपजीविकेची पुनर्स्थापना या दोन्ही बाबींचा विचार पॅकेज मध्ये केल्यामुळे पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळेल. स्थानिक स्तरावर आर्थिक घडामोडींना चालना देईल आणि पूरग्रस्तांना पुराच्या संकटातून लवकर सावरण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. इंदू राणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT