बोईसर : बोईसर-चिल्हार मार्गावरील बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीत अधिकारी फ्युएल पंपाच्या पाठीमागे असलेल्या एका बेकायदेशीर गोदामाला रविवारी (दि.२२) दुपारी तीनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली असली, तरी या घटनेने पेट्रोल पंपालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर गोदामांचा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही आग लागली त्या परिसरात सुमारे दहा ते बारा ट्रक, जेसीबी तसेच विविध प्रकारची गोदामे आहेत. त्यातच अगदी जवळ पेट्रोल पंप असल्याने आगीचा विस्तार झाला असता तर परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता होती. आगीची तीव्रता वाढून ती वाहनांपर्यंत किंवा पेट्रोल पंपाच्या दिशेने पोहोचली असती, तर मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानीचाही धोका निर्माण झाला असता.
औद्योगिक आणि व्यावसायिक विस्ताराच्या नावाखाली बेटेगाव परिसरात अनेक ठिकाणी गोदामे आणि व्यावसायिक वापराच्या जागा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अशा गोदामांना आवश्यक परवानग्या आहेत का? अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन केले जाते का आणि आपत्कालीन परिस्थितीत आग नियंत्रणासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत का? याची तपासणी होणे आवश्यक आहे.
रविवारी घडलेली आग ही केवळ एका गोदामापुरती मर्यादित घटना मानून चालणार नाही. पेट्रोल पंप, अवजड वाहने आणि गोदामे एकाच परिसरात असताना अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असेल, तर भविष्यात मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे बेटेगाव ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि अग्निशमन यंत्रणेने या परिसरातील गोदामांची पाहणी करून त्यांच्या परवानग्या, वापर आणि अग्निसुरक्षा व्यवस्थेची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. वेळीच आग नियंत्रणात आली म्हणून संभाव्य अनर्थ टळला. मात्र, प्रशासनाने आता तरी जागे होऊन बेकायदेशीर गोदामांवर कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.