Palghar Fake Call Centre pudhari photo
पालघर

Palghar Fake Call Centre : पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

भोपोलीतील बंगल्यावर छापा; सात अटकेत

पुढारी वृत्तसेवा

पालघर : परदेशी नागरिकांना लक्ष्य करून सायबर फसवणुकीचा गोरखधंदा चालवणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पालघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विक्रमगड तालुक्यातील भोपोली येथील एका बंगल्यात सुरू असलेल्या कॉल सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी सात लॅपटॉप, १४ मोबाईल, चार हेडफोन, एक राऊटर, कार व मोटारसायकल असा २१ लाख ८३ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सायबर गुन्हेगारीच्या प्रकाराचा धक्कादायक चेहरा समोर आला आहे.

मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोपोली येथे एका बंगल्यात बनावट कॉल सेंटर चालवून परदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बंगल्यावर छापा टाकला. यावेळी तेथे सात जण आढळून आले. ताब्यात घेतलेल्या टोळीकडून अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य केले जात होते.

संबंधित नागरिकांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये व्हायरस असल्याचे भासवणारे मेसेज पाठवून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात होती. त्यानंतर गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडले जात होते. त्यानंतर या गिफ्ट कार्डद्वारे मिळणारी रक्कम हडप केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • परदेशी नागरिकांना व्हायरसचा बनावट अलर्ट देऊन गिफ्ट कार्डच्या माध्यमातून आर्थिक गंडा घालण्याचा प्रकार भोपोलीसारख्या ग्रामीण भागातील बंगल्यातून सुरू असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. या टोळीचे आणखी कोणाशी संबंध आहेत आणि या फसवणुकीची व्याप्ती पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT