पालघर ः आपल्या मागणी हक्कासाठी आंदोलन करणार्या महिला कामगारांच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार करणार्या कंपनीच्या मालकीणीवर पालघर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालकीणीसह चालक व इतरांवरही जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
थकीत वेतन आणि हक्कांसाठी शांततेत आंदोलन करणार्या महिला कामगारांच्या अंगावर कंपनीच्या वयोवृद्ध मालकिणीने गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार पालघर पूर्व येथील मोजे बनविणार्या एका कंपनीसमोर घडला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेचा थरकाप उडवणार्या प्रकारामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
स्वतःच्या हक्कासाठी आधी या कामगारांनी व्यवस्थापनाकडे मागणी केली होती मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शांततेत त्यांनी आंदोलन सुरू केले यामध्ये महिलांचा सहभाग होता मात्र त्यांचे म्हणणे ऐकून न घेता मालकीणीने थेट आंदोलनकर्त्या महिलांच्या अंगावर गाडी नेली यामध्ये दोन तीन जणी जखमी झाल्या होत्या. जखमींवर पालघरच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
पालघर पोलिसांनी या घटनेची चौकशी करून जखमी महिला कामगार विद्या राजकुमार यादव (27) रा. शिरगांव हिचा जबाब मंगळवारी संध्याकाळी नोंदवला. त्या अनुषंगाने जीवे मारण्याचा प्रयत्न घेतल्याप्रकरणी कंपनीच्या वयोवृद्ध मालकीणीवर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा चालक मोहम्मद दानेश जाहिरुल हसन, मालक जननीन कात्रज यांच्याविरुद्ध फिर्यादीच्या जबाबनुसार दाखल असून हसन पोलिसांच्या ताब्यात आहे.