पालघर शहर : मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खोटी नावे, बोगस मतदार पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत घुसवण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांची भेट घेत दोषींवर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिल गावड, तालुका अध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष हंसराज घरत, माजी नगरसेवक अमर बाजपेयी व प्रितम राऊत, युवक तालुका अध्यक्ष श्रेयश पाटील, रोहन पाटील व ऍड. अविनाश लिंबोला व पदाधिकारी उपस्थित होते.
पालघर नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतचोरांनी ऑनलाईन अर्ज भरून तसेच काही बी.एल.ओ. यांना आर्थिक आमिष दाखवून पालघर नगरपरिषद क्षेत्राबाहेरील मतदारांची नावे, बोगस मतदार मोठ्या प्रमाणात पालघर नगरपरिषद क्षेत्रातील मतदार यादीत समाविष्ट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे.
खोटी, बोगस मतदारांची नावे यादीत घुसवल्यामुळे मतदारांच्या मतदान हक्कावर गदा येण्याची शक्यता असून निवडणुकीच्या पारदर्शक प्रक्रियेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिल. त्यामुळे पालघर नगरपरिषद क्षेत्रात गेल्या काही महिन्यांत मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेले मतदार तपासून मतदार यादीची पूनरपडताळणी करण्यात यावी. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली असून कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.