पालघर : हनिफ शेख
खरंतर सध्या आपल्या देशाची वाटचाल आत्मनिर्भरतीकडे चाललेली असताना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज नवीन जिल्हा होऊन बारा वर्षे होत आली तरी देखील पालघर जिल्हा हा आरोग्याच्या बाबतीत कधी आत्मनिर्भर होणार हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे. पालघर जिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर यांचे काम सुरू आहे. मात्र अनेक वर्षापासून रखडलेल्या कामाची पुर्णता नक्की कधी होणार आणि नागरिकांना त्याचा लाभ केव्हा मिळणार या प्रतिक्षेत येथील नागरिक आहेत.
पालघर जिल्हा मुख्यालयापासून 15 किमी दूर असलेल्या मनोर या ठिकाणी जो संपूर्ण जिल्ह्याला मध्यवर्ती ठरू शकतो अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरचे काम सुरू आहे. हे काम 2016 ला मंजूर झाले होते. त्यावेळी या कामाची एकूण रक्कम 74 कोटी होती .यानंतर 2024 मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता काढून या कामाची एकूण रक्कम 120 कोटी दोन लाख एवढी करण्यात आली.
आज घडीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून संकीर्ण स्थापत्य कामे विद्युत विषयक काम व इतर अनुषंगिक कामे प्रगतीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता या कामासाठी अजून बराच अवधी लागणार आहे. यामुळे 2016 ते सध्या सुरू असलेले 2026 आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणारा प्रकल्प जर दहा वर्ष झाल्यानंतरही पूर्ण होणार नसेल तर प्रत्येक क्षण सर्व सुख सोयी युक्त आरोग्य यंत्रणा आणि त्यासाठी आवश्यक तज्ञ वैद्यकीय अधिकारी कधी भरण्यात येतील हा संशोधनाचा विषय आहे.
असे असताना या ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन एक मे रोजी करण्याच्या हालचाली देखील सुरू झाल्या होत्या. मात्र सध्या तरी तसा कोणताही पत्रव्यवहार जिल्हा शल्य चिकित्सक कार्याकडे झालेला नसल्याने हे उद्घाटन होईल की नाही याबाबत आज तरी साशंकता असली तरी जिल्ह्यातील आजची आरोग्याची परिस्थिती पाहता नुसत्या आरोग्य इमारती नकोत तर त्यामध्ये सर्व आजारावर उपचार करू शकणाऱ्या आवश्यक यंत्रणा आणि आरोग्य अधिकारी देखील असाव्यात अशी अपेक्षा जिल्हा वाशियाकडून व्यक्त होत आहे.
पालघर जिल्हा रुग्णालय व मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन एक मे रोजी करण्याचे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. त्या संदर्भात आमदार राजेंद्र गावित यांनी घेतलेल्या बैठकीत ट्रॉमा केअर सेंटरचे काम पूर्ण झाले असून जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे काम अजून बरेचशे बाकी असल्याने व त्यासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्गाची अजून पर्यंत नियुक्ती झाली नसल्याने एक मे रोजी रुग्णालय चालू करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा अट्टहास इथल्या आमदारांना व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना अडचणीचा ठरू शकतो.
पूर्णपणे तयारी केल्यानंतरच हे दोन्ही रुग्णालय सुरू केली तर नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत. अन्यथा त्याचा भार जिल्हा आरोग्य यंत्रणेवर पडणार आहे. ट्रॉमा केअर सेंटरचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाले असून थोड्याफार प्रमाणात किरकोळ काम बाकी आहेत तीही काही दिवसात पूर्णत्वास जातील. मात्र रुग्णालयासाठी आवश्यक असणारे वर्ग 3/4 तसेच मेडिकल ऑफिसर ची पद भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अजून पर्यंत त्याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याने हे रुग्णालय चालू करून आलेल्या रुग्णांची तपासणी कोण करणार हा मोठा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला आहे.
असे असताना आरोग्य मंत्री 1 मे रोजी याचे उद्घाटन करण्यासाठी का प्रयत्नशील आहेत एक न उलगडणारे कोडे आहे. पालघर जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे सुद्धा1 मे रोजी उद्घाटन करणार होते. मात्र या रुग्णालयासाठी आवश्यक असलेले फायर फायटिंग सिस्टिम तसेच लिफ्ट याची काम अजून बाकी आहेत. विद्युत काम करण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन मधून एमएससीबी कडे वर्ग करण्यात आला आहे.
ट्रॉमा केअर सेंटरची इमारत 1 तारखेच्या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे देण्यात येईल. मात्र या रुग्णालयात आवश्यक असलेल्या उपकरणे याबाबत कुठल्याच प्रकारचे नियोजन अजून पर्यंत झालेले नाही. इमारत तयार होईल मात्र उपकरण नसले तर इथे आलेल्या रुग्णांवर उपचार कसे होणार. यावर पालघर ठाणे रायगड या जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये वापरात नसलेली उपकरण इथे आणून जोपर्यंत नवीन उपकरणे येत नाही तोपर्यंत याचा वापर करावा अशा प्रकारचं नियोजन करण्यात आले आहे.डॉ रामदास मराड, जिल्हा शल्य चिकित्सक.