Palghar Crime | गुजरातहून येणारा तब्बल ३८ लाखांचा गुटखा जप्त; गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद? 
पालघर

Palghar Crime | गुजरातहून येणारा तब्बल ३८ लाखांचा गुटखा जप्त; गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद?

महामार्गावर कासा पोलिसांची मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या महाराष्ट्रात आणला जात असून, मुंबई, वसई, भिवंडी, कल्याण यांसारख्या शहरांमध्ये त्याची खुलेआम वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ३८ लाख २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या घटनेमुळे महामार्गावरील गुटखा तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोळ टोलनाक्याजवळ सोमवारी संध्याकाळी काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना एक संशयास्पद आयशर टेम्पो दिसून आला. याबाबत त्यांनी तात्काळ कासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयुक्तरित्या सदर वाहन थांबवून चौकशी केली असता, गुजरातहून मुंबईच्या दिशेने महाराष्ट्रात बंदी असलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा वाहतूक होत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता, एमएच ४८ सीबी १७२६ क्रमांकाच्या आयशर टेम्पोमधून ३४ मोठ्या गोण्यांमध्ये भरलेला गुटखा आढळून आला. या गुटख्याची किंमत तब्बल २७ लाख २१ हजार रुपये असून, वाहनासह एकूण ३८ लाख २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी वाहन चालक अरमान इस्माईल शेख (वय २१) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात विविध कलमांअंतर्गत कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान गुटखा माफियांच्या टोळीतील काही संशयित व्यक्ती परिसरात फिरकत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायामागे नेमके कोणाचे पाठबळ आहे? महामार्गावरून राजरोसपणे सुरू असलेल्या गुटखा वाहतुकीकडे स्थानिक गुन्हे शाखेचे दुर्लक्ष का होते? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, ही कारवाई कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार तसेच कासा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून, अवैध गुटखा तस्करीच्या साखळीचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT