Palghar Crime : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा गावच्या हद्दीत ७० लाखांचा गुटखा-सुगंधी तंबाखू जप्त! 
पालघर

Palghar Crime : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा गावच्या हद्दीत ७० लाखांचा गुटखा-सुगंधी तंबाखू जप्त!

अन्न व औषध प्रशासन व कासा पोलिसांची संयुक्त कारवाई; आयशर वाहनासह एकास अटक

पुढारी वृत्तसेवा

कासा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू व पान मसाला घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनावर अन्न व औषध प्रशासन आणि कासा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ७० लाख ५ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी तवा गावाच्या हद्दीत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर करण्यात आली. या प्रकरणी मोहम्मद अनिस मोहम्मद आयुब शेख (वय ३९) याला अटक करण्यात आली आहे.

तवा येथील राजधानी हॉटेल ते आश्रमशाळेदरम्यान एनएच-०८च्या सर्व्हिस रोडवर संशयास्पद आयशर वाहनाची तपासणी करण्यात आली. एमएच ४३ वाय ७९११ क्रमांकाच्या बंद कंटेनरमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये केसरयुक्त विमल पान मसाल्याच्या ९९ गोण्या, व्ही-०१ सुगंधित तंबाखूचे ७,२४५ पुडे, व्ही-०१ सुगंधित तंबाखूचे ग्रीन पाऊच १,६५० पुडे तसेच ब्ल्यू पाऊच ४,४०० पुडे यांचा समावेश आहे. जप्त मुद्देमालाची किंमत ५० लाख ५ हजार ६५० रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत २० लाख रुपये असल्याने एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ७० लाख ५ हजार ६५० रुपये आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी स्वादिष्ट व सुगंधित तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ मिश्रित पान मसाला, विमल आदी प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध असताना आरोपीने हे पदार्थ वाहतूक केल्याचे तपासात समोर आले.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश रामराव कावळे यांच्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धांगडा करीत आहेत.

ही कारवाई कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील, पोलीस उपनिरीक्षक धांगडा, सफौ माळी, पोलीस हवालदार भोये व पोलीस शिपाई भोसले तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्तपणे केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT