Administrator
पालघर

Palghar | पालघर आगारातील बहुतांश बसेस नादुरुस्त अवस्थेत

भंगार बसमधून प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

पुढारी वृत्तसेवा

पालघर : पालघर एसटी आगारातील बहुतांश बसेस मोडकळीस आणि भंगार अवस्थेत आल्या आहेत. दुरुस्ती अभावी मोडक्या - तोडक्या आणि नादुरुस्त अवस्थेतील एसटी बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दुरुस्ती अभावी अपघातांची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालघर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी ग्रामीण आणि दुर्गम भागातून नागरिक मोठ्या संखेने येत असतात. ग्रामीण भागातील जिल्हा मुख्यालयाकडे येणाऱ्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी नवीन बसेस उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष केले जात असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

पालघर आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी एकूण ६२ बसेस आहेत. त्यात शिवशाही सेवा देणाऱ्या नऊ बसगाड्या आहेत. इंजन (मेकॅनिक) दुरुस्तीसाठी आगारात ३२ मेकॅनिक आहेत. तर वाहक व चालक मिळून २१० कर्मचारी सेवा देत आहे. मात्र आगारातील जुन्या झालेल्या बसेसचे पत्रे तुटून पडले आहेत. तुटलेल्या पत्र्याचा भाग दुरुस्त करण्यासाठी फिटर उपलब्ध नाही. टायरचे पंचर दुरुस्तीसाठी कामगार उपलब्ध नसल्यामुळे प्रवसा दरम्यान रस्त्यात बसचे टायर पंचर झाल्यास चालक-वाहक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होते.

पालघर आगारातून कोल्हापूर, सांगली, शिरपूर, धुळे, जळगाव, पुणे, आणि छत्रपती संभाजीनगर साठी जलदगतीच्या बस मुकामी जात असतात. वेळेत दुरुस्ती होत नसल्याने अनेक वेळा लांब पल्ल्याच्या बस रस्त्यातच नादुरुस्त होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. एसटी बस मधून लाडक्या बहिणींना अर्ध्या दरात प्रवास असला तरी वाटेत बस नादुरुस्त झाल्यास त्रास सहन करावा लागत आहे. महिलांसह अन्य प्रवाशांना पूर्ण बस भाडे देऊन सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागतो. एसटी बसच्या तिकीट दरात दिवसेंदिवस वाढ होत असतांना बहुतांश बसेस मोडकळीस आल्याने प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यास पालघर आगार कमी पडत आहे. जुन्या आणि भंगार अवस्थेतील बसेसचे जागोजागी पत्रे निघालेले आहेत. अस्वच्छ आणि प्रवाशांसाठी असलेल्या खिडक्या मोडलेल्या अवस्थेत दिसून येतात. पावसाचे पाणी आत येत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडते. तुटलेल्या पत्रांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालघर आगारात कार्यरत असलेल्या ६० बसेस पैकी बहुतेक जुन्या आहेत, विभागीय कार्यालयाकडे नवीन बसेसची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध बसेस दुरुस्त करून सेवा देण्यात येत आहे.
- स्मिता मिसाळ, डेपो मॅनेजर, पालघर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT