बोईसर : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. हा अपघात रविवारी (दि.२५) चिल्हार रस्त्यावरील वारंगडे हद्दीतील विराज कंपनीच्या हत्ती गेटजवळ झाला. धीरज अर्जुन सुर्वे (रा. आंबेदे, ता. पालघर) असे मृत तरूणाचे नाव असून तो आंबेदे येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर जखमी तरूण गंभीर अवस्थेत रस्त्यावरच पडून होता. फोन करूनही रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अखेर स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या एका दुचाकीस्वाराची ओळख पटली असून नातेवाईक घटनास्थळी हजर झाले. त्यानंतर संबंधित तरुणावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दुचाकीस्वाराची लवकर ओळख न पटल्याने त्याला सरकारी रुग्णालय टीमा हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. दरम्यान, त्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
दरम्यान, बोईसर-चिल्हार रस्ता सध्या अपूर्ण अवस्थेत असून हा रस्ता तारापूर एमआयडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादात अडकलेला आहे. रस्त्याची दुरवस्था, अपुरा प्रकाश, अपघातप्रवण ठिकाणे, यामुळे या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. मात्र, याकडे ना एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे, अशी तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अपघातांची मालिका सुरू असतानाही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणखी किती बळी जाणार, असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे