मोखाडा : हनिफ शेख
अगदी काही महिन्यावर येऊन ठेवलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून महायुती की महाआघाडी हे ठरण्याच्या अगोदरच पालघर जिल्ह्यातील भाजप मात्र इलेक्शन मोडवर आल्याचे दिसत असून मोखाडापासून ते वसई विरार पर्यंत अनेक पक्षातील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. यासाठी त्या त्या विधानसभेतील भाजप आमदारांच्या उपस्थितीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या नेतृत्वाखाली सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रवेशाचा धडाका असल्याचे दिसून येत आहे यातूनच अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलल्या निवडणुकीची भाजप जोरदार तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.
याच वेळी राज्यातील महायुतीचे नेतृत्व जरी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीधर्म पाडूनच होतील असं सांगत असले तरी आज घडीला पालघर जिल्ह्यामध्ये महायुतीतून या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढल्या जातील या याबाबत आज तरी शंका उपस्थित केली जाऊ शकते . अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. कारण महायुती सोडून भाजपाच्या ज्या तालुकानिहाय बैठका सध्या होत आहेत त्यामधून सर्व पमुख कार्यकर्त्यांचा स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सूर निघत आहे आणि याला भाजपामधील जिल्ह्यातील नेतृत्व सुद्धा प्रतिसाद देत असून यातूनच शतप्रतिशत भाजप या घोषणेला साजेशी वाटचाल पालघर जिल्हा भाजपाची आज तरी दिसून येत आहे.
2019 मध्ये पालघर जिल्ह्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सहापैकी भाजपला एकही जागा मिळवता आली नव्हती. यामुळे विधानसभेत भाजपाचा सुपडा साप झाल्याचे अनेकदा टीका भाजपवर होत होती मात्र 2024 च्या विधानसभेत भाजपाने वसई नालासोपारा आणि विक्रमगड या तीनही विधानसभेत आपले आमदार निवडून आणून सध्या भाजप जिल्ह्यात पुन्हा एक नंबरचा पक्ष म्हणून उदयास आला आहे.या निवडणुकात जरी महायुती म्हणून या निवडणुका झाल्या असल्या तरी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात सुद्धा भाजपाला नंबर वन बनण्याची अभिलाषा लपवता आलेली नाही. यातूनच सध्या भाजपाने प्रत्येक तालुक्यातून अनेक पक्षातील पदाधिकार्यांचा प्रवेश आपल्याकडे करून घ्यायला सुरुवात केलेली आहे.
याचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप करून घेण्याच्या विचारात आहे. पालघर जिल्ह्यात एकूण 57 जिल्हा परिषद सदस्य असून तालुका निहाय ही आकडेवारी पाहिल्यास तलासरी 5 डहाणू 13 विक्रमगड 5 जव्हार 4 मोखाडा 3 वाडा 6 पालघर 17 आणि वसई चार अशी निवडून येणार्या जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आहे.
गत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जर आपण पक्षीय बलाबल पाहिलं तर यामध्ये एकत्रित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 16 सदस्य निवडून आले होते. यावेळी जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे हे राष्ट्रवादीसोबत होते दुसरीकडे भाजप 13 शिवसेना 18 सीपीएम 6, बहुजन विकास आघाडी 4 अशी सदस्य संख्या होती मात्र या निवडणुकीत हे चित्र पूर्णपणे वेगळे असेल कारण डहाणू तालुक्यातील काँग्रेसचा एक सदस्य आणि शिवसेनेचे दोन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे याशिवाय तेव्हा राष्ट्रवादीसोबत असलेले निलेश सांबरे हे आज घडीला शिवसेनेचे उपनेते झालेले आहेत.
यंदाची पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही पूर्णपणे वेगळी असणार असून भाजपने लावलेला प्रवेशाचा धडाका आणि त्यांचा मित्र पक्ष शिवसेनेत सुद्धा वाढत चाललेली भाऊ गर्दी पाहता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशी शक्यता धूसर आहे. त्यातून महायुतीत मोठी बंडाळी सुद्धा होऊ शकते त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो यामुळे येथे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढतील असे चित्र स्पष्ट दिसत आहेच मात्र याचाच फायदा उचलत पालघर जिल्ह्यातील भाजप जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.