पालघर : पुरवठा विभागाकडून रेशनिंग कार्ड धारकांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरवठा विभागाकडून वेळोवेळी मुदतवाढ दिल्या नंतरही पालघर जिल्ह्यात चार लाख 54 हजार 274 लाभार्थ्यांची केवायसी अपूर्ण आहे.
एकूण लाभार्थ्यांपैकी 24.48 टक्के लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण नसल्याने त्यांना रेशनिंग दुकानातून मिळणार्या धान्यांपासून वंचित राहावे लागणार आहे.पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील एक हजार 85 रेशनिंग दुकानांमधून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे एक लाख सात हजार 701 क्विंटल धान्य लाभार्थ्यांना वितरित केले जात आहे. दुर्गम भाग असलेल्या मोखाडा तालुक्यातील 33.07 टक्के लाभार्थ्यांची केवायसी अपूर्ण आहे.
पुरवठा विभागाकडून वेळोवेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन रेशनिंग कार्ड धारकांना करण्यात आले होते.पालघर जिल्ह्यातील एकूण 18 लाख 55 हजार 591 लाभार्थ्यांपैकी 4 लाख 54 हजार 274 लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. रेशनिंग कार्डधारकांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.मुदत उलटूनही केवायसी न केलेल्या कार्डधारकांचे धान्य आगामी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये केवायसीचे 18,55,591 लाभार्थी असून त्यापैकी 4,54,274 लाभार्थ्यांची केवायसी होणे अद्याप बाकी आहे. वेळोवेळी मुदतवाढ देऊनह मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी आपली ई- केवायसी केलेली नसल्याने पुरवठा विभागा कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आकडेवारी वरून समोर आले आहे.
ई-केवायसी करण्याची मुदत उलटल्याने ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांबाबतचा निर्णय शासन स्तरावरून होण्याची शक्यता आहे.
प्रलंबित ई-केवायसी बाबतच्या दुकाननिहाय याद्या दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.धान्याचा लाभ घेणार्या रेशनिंग कार्ड धारकांनी ई-केवायसी बाबतचे तपशील रेशनिंग दुकानातून तपासून घेतल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांबाबत शासन स्तरावरून निर्णय होईल.सीमा महलै, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर जिल्हा.