आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळूराम काका धोदडे यांचे निधन झाले. Pudhari Photo
पालघर

आदिवासी चळवळीचा बुलंद आवाज हरपला: काळूराम धोदडे यांचे निधन

पुढारी वृत्तसेवा

डहाणू : पुढारी वृत्तसेवा: आदिवासी समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देणारे, जल, जंगल, जमीन या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे आणि भूमिपुत्र शेतकऱ्यांचे हक्काचे रक्षण करणारे आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक काळूराम काका धोदडे यांचे गुरुवारी (दि. १०) रात्री वयाच्या ८८ व्या वर्षी मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

आदिवासी हक्कांचे रक्षक - काळूराम धोदडे यांनी पाच दशकांपेक्षा अधिक काळ आदिवासी समाजाच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष केला. भूमिपुत्र आदिवासींच्या जल, जंगल, जमीन हक्कासाठी त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले. त्यांनी आदिवासी समाजाला सन्मानाने जगायला शिकवले, त्यांच्या हक्कांचे रक्षण केले आणि सामाजिक न्यायासाठी लढा उभारला. त्यांचे कार्य फक्त आदिवासी समाजापुरते मर्यादित न राहता, संपूर्ण शेतकरी वर्गासाठीही प्रेरणादायी ठरले.

भूमीसेना आणि आदिवासी एकता परिषदच्या स्थापनेत योगदान

काळूराम धोदडे हे भूमीसेना आणि आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक होते. या दोन संघटनांच्या माध्यमातून त्यांनी अनेक संघर्ष आणि आंदोलनांचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने त्यांच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणावर लढा दिला. आदिवासी समाजासाठी त्यांनी केलेले योगदान त्यांना समाजाचा ‘काका’ बनवून गेले, ज्यांच्या संघर्षातून अनेक आदिवासी बांधव प्रेरित झाले.

काळूराम काका धोदडे यांचे अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार ११ ऑक्टोंबर रोजी मनोर (दामखिंड) येथे करण्यात आले. त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजाने एक महान नेता गमावला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT