Palghar Mumbai-Ahmedabad highway accident |
पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावाच्या हद्दीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मेंढवण खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेल समोर हा अपघात झाला.
ग्लोरिया वेल्स (वय 73), क्लेटन वेल्स (वय 42) आणि फॅबीओला वेल्स (वय 45) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हेनान वेल्स (वय 63) आणि रेडन वेल्स (वय 9) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डस्टर कार मुंबईच्या दिशेने जात होती. त्यावेळी मेंढवन खिंडीच्या उतारावर मनोर गेट हॉटेल समोर काँक्रीटच्या रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरु होते. त्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आली होती. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने अचानक आपत्कालीन ब्रेक दाबला. त्यामुळे भरधाव वेगाने आलेल्या डस्टर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि समोरच्या वाहनाला जाऊन धडकली. त्याचवेळी कारच्या पाठिमागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बल्कर ट्रकने डस्टर कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कारचा चेदामेंदा झाला.
अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मनोर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोर पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले.