खोडाळा : मोखाडा तालुक्यातील खोडाळा पासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर असलेल्या गारनदी पुलावरून हायवा डंपर थेट नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एम.एच. १५ के.एस. २२८२ या क्रमांकाचा डंपर नाशिक जिल्ह्यातील घोटी येथील असून तो जव्हार येथून रात्री १२ वाजेच्या सुमारास घोटी कडे जात होता. गारनदी पुलावर आल्यावर वाहन चालक डब्लू केवट (वय २२, रा. मध्य प्रदेश) याला वळणाचा अंदाज न आल्याने डंपर पुलावरून कठडा तोडून थेट नदीत कोसळला.
अपघातात डंपरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चालकाला बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. डंपर मालकाचे नाव समजू शकले नाही. या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.