कासा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील धोकादायक उड्डाणपुलाच्या वळणावर गुरुवारी (दि. १७) दुपारी अडीचच्या सुमारास गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारा केमिकल टँकर पलटी झाला. या अपघातात टँकरचालक जखमी झाला असून, अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकलची गळती झाली. केमिकलचा उग्र वास परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जीजे १२ एझेड ८९०० क्रमांकाचा टँकर गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात असताना चारोटी उड्डाणपुलावरील नागमोडी वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर रस्त्यावर पलटी झाला. अपघातात चालक जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी चालकाची प्रकृती आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
टँकरमधून मोठ्या प्रमाणात केमिकल गळती होत असल्याचे दिसून आले. या केमिकलचा उग्र वास आजूबाजूच्या परिसरात पसरला होता. प्राथमिक माहितीनुसार, सदर केमिकलचा वापर रंगनिर्मिती तसेच इतर औद्योगिक कामांसाठी केला जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, केमिकलचा नेमका प्रकार आणि त्याची धोकादायकता याबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच रुग्णवाहिका आणि पोलिसांची वाहनेही घटनास्थळी उपस्थित होती. केमिकल गळतीमुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन बचावकार्य आणि टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते.
अपघातानंतर महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक दुपारपासून सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली. त्यामुळे मुंबई आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर केमिकल मोठ्या प्रमाणात पसरल्याने वाहतूक सुरळीत करण्यास अडथळा निर्माण झाला होता. संध्याकाळपर्यंत अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू होते. अपघाताची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. चारोटी महामार्ग पोलिसही वाहतूक नियंत्रणासाठी उपस्थित होते. अग्निशामक दल, पोलिस आणि इतर संबंधित यंत्रणांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
धोकादायक उड्डाणपुलावर कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज..
चारोटी येथील उड्डाणपुलावरील नागमोडी वळणामुळे वाहनचालकांना पुढील रस्त्याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. काही वर्षांपूर्वी याच परिसरात गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता. त्यावेळी अनेक वाहने जळून खाक झाली होती. अप्सरा हॉटेललाही आग लागली होती आणि काही नागरिकांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण झाल्यानंतर चारोटी उड्डाणपुलावरील संरक्षण कठड्याची उंची कमी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अपघात झाल्यास काही वाहने पुलावरून थेट सेवा रस्त्यावर पडण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चारोटी उड्डाणपुलाची पाहणी करून वळणाची रचना, दिशादर्शक फलक, वेगमर्यादा आणि संरक्षण कठड्याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.