Aase Gram Panchayat Water Supply Scheme Inquiry Pudhari
पालघर

Palghar News | सदोष, अपूर्ण नळयोजनेची सखोल चौकशी करा; आसे ग्रामपंचायतीची मागणी

मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेतील कथित अनियमिततेचा मुद्दा ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

Aase Gram Panchayat Water Supply Scheme Inquiry

मोखाडा : पालघर जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेतील कथित अनियमिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आसे ग्रामपंचायतीने सदोष आणि अपूर्ण नळयोजनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, योजनेतील संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाच्या नोंदीत योजना पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले तरी गावकऱ्यांना आजतागायत नळाद्वारे पाणी मिळालेले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मोखाडा तालुका हा दरवर्षी तीव्र पाणीटंचाईला सामोरा जाणारा भाग आहे. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने जलजीवन मिशन योजना सुरू केली. २०५३ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून प्रत्येक नागरिकाला दररोज ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या योजनेत ठेवण्यात आले होते. मात्र, अनेक ठिकाणी कामे अपूर्ण राहिल्याने किंवा निकृष्ट दर्जाची झाल्याने योजनेचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळालेला नाही, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

मोखाडा तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत ५६ नळपाणी पुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यापैकी आसे ग्रामपंचायत ही सर्वाधिक पाणीटंचाईग्रस्त ग्रामपंचायतींपैकी एक आहे. भोवाडी (शास्त्रीनगर) आणि कुंडाचापाडा येथील नागरिकांना आजही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, यंदाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

ग्रामविकास अधिकारी सचिन अहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी झालेल्या ग्रामसभेत अपूर्ण नळयोजनेची चौकशी तसेच संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर २० जून रोजी महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. टँकरद्वारे तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनानंतर गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांनी आंदोलकांशी चर्चा केली. नागरिकांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. तसेच नळयोजनेच्या चौकशीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, ग्रामपंचायतीने केलेल्या प्राथमिक पडताळणीत संबंधित नळयोजना मे २०२३ मध्ये पूर्ण झाल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीत दाखविण्यात आल्याची बाब समोर आली. मात्र, प्रत्यक्षात गावातील नागरिकांना अद्याप नळाद्वारे एक थेंबही पाणी मिळालेले नाही. परिणामी एक हजारांहून अधिक नागरिक आणि सुमारे ४२० जनावरांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

या पार्श्वभूमीवर आसे ग्रामपंचायतीचे सरपंच अनंता मौळे यांनी संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ललित बोरदे, शाखा अभियंता कुणाल पवार आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या प्रकरणामुळे मोखाडा तालुक्यासह संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जलजीवन मिशन योजनेतील कथित अनियमिततेची व्यापक चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT