नालासोपारा (पालघर) : नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर परिसरात शनिवारी मध्यरात्री क्षुल्लक वादातून नायजेरियन नागरिकाचा खून करण्यात आला. लकी इकेचकव उईजे ३२ असे मृत नायजेरियन नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.20) मध्यरात्री प्रगतीनगरमधील रोशन अपार्टमेंटजवळील मोनू किराणा दुकानाजवळ तीन नायजेरियन नागरिक आपापसांत बोलत उभे होते. त्यावेळी परिचयाचा लकी इकेचकव उईजे हा तेथे आला. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि तो पुढे मारामारीत परिवर्तित झाला. दरम्यान, दोन आरोपींनी लकीच्या डोक्यात काचेची बाटली फोडली व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यात लकीचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अयूला बाबाजिदे बार्थलोम (५०) आणि ओघेने इगेरे (४७) यांना अटक करण्यात आली असून ओडिया इझू पेक्यूलिअर (५०) हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांची लक्षणीय वस्ती असून प्रगतीनगर येथे त्यांची संख्या विशेषतः जास्त असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.