नालासोपारा : नालासोपारा परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत असून,शहरात बेकायदेशीर वाढणारी नायजेरियन नागरिकांची संख्या चिंतेचा विषय बनत आहे.तसेच अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहेत.यासंदर्भात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारींमध्ये वाढत होत होती. याचपार्श्वभुमीवर पोलिसांनी धडक कारवाई करत 100 पेक्षा जास्त नायजेरिन नागरिकांची धरपकड केली आहे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे.
वसई-विरारसह नालासोपारासह अन्य परिसरात नायजेरियन नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातील अनेकजण गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहेत. दरम्यान शहरात वाढते अतिक्रमन, वाढती गुन्हेगरी या अनुशंगाने पोलिसांनी बुधवारी धडक कारवाईला सुरूवात केली आहे. विशेषतः नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर भागात तुळींज पोलिसांनी केलेल्या मोठ्या कोंबिंग ऑपरेशनमुळे या समस्येचे भयावह वास्तव समोर आले आहे. बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल 109 जणांना ताब्यात घेतले, ही बाब वाढत्या गुन्हेगारीचे स्पष्ट द्योतक मानली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून या परिसरात ड्रग्ज विक्री, संशयास्पद हालचाली, तरुणांचे व्यसनाधीन होणे, तसेच किरकोळ गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी घराघरांत झाडाझडती घेतली असता अनेक जणांकडे वैध व्हिसा व पासपोर्ट नसल्याचे समोर आले आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अनेक नागरिक भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली.
या कारवाईदरम्यान लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना ताब्यात घेण्यात आल्याने मानवी तस्करी, ड्रग्ज नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचा संशय अधिक बळावला आहे. वाढती लोकसंख्या, अपुरी पोलीस यंत्रणा आणि बेकायदेशीर वास्तव्यास मिळणारे स्थानिक पाठबळ यामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे चित्र दिसून येते.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या कोंबिंग ऑपरेशन्स सातत्याने राबवणे, परदेशी नागरिकांची कागदपत्रांची काटेकोर तपासणी करणे आणि ड्रग्ज विक्रीविरोधात कठोर पावले उचलणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा नालासोपाऱ्यासारख्या शहरांमध्ये वाढती गुन्हेगारी ही प्रशासनासाठीच नव्हे, तर समाजासाठीही मोठे आव्हान ठरणार आहे.