खानिवडे : वसई पूर्वेतील महामार्गावरून सहज दिसणाऱ्या ऐतिहासिक टकमक गडावर सद्ध्या दुर्गप्रेमी व पर्यटकांचे भेट देणे सुरू असून नुकताच द्रविन गजर (37) रा. कांदिवली हा पर्यटक गडावर गेला असताना रस्ता भुलल्याने टाक्याच्या डोंगर भागात भरकटला होता. मात्र त्याचा मोबाईल सुरू असल्याने त्याने पोलिसांशी संपर्क साधल्याने त्याची स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम घेऊन सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मुंबईच्या कांदिवली येथील दुर्गप्रेमी द्रविन गजर (37) वसईच्या इतिहासातील महत्वाचा असलेल्या सकवार व भारोळ या गावांच्या पाठीमागे असलेल्या टममक गडावर गेला होता. मात्र गडावर दाट झाडी व झुडपे पसरलेली आहेत. यातून मार्गक्रमण करताना तो रस्ता भुलला व जंगलात हरवला. त्यामुळे त्याला नेमक्या कोणत्या दिशेने जायचे हे अनेकदा प्रयत्न करूनही योग्य दिशा सापडली नाही. त्यामुळे तो या जंगलात भरकटला होता. मात्र त्याच्याकडे असलेल्या मोबाईलद्वारे त्याने मांडवी पोलिसांशी संपर्क साधून जंगलातून बाहेर काढण्याची विनवणी केली. पोलिसांनी स्थानिक नागरिक व टकमक गडाची पूर्ण माहिती असलेल्या बबन बरफ याची मदत घेतली व या पर्यटकाची सुखरूप सुटका केली.
बीट मार्शलचे विपुल आव्हाळे, अविनाश जांभळकर यांनी स्थानिकांच्या मदतीने सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबवून पर्यटक द्रविन गजर याचा शोध घेतला. रविवारी दुपारी डायल 112 या क्रमांकावर मांडवी पोलिसांना टकमक किल्ल्यावर एक पर्यटक अडकला असल्याचे समजले. या आधारे विपुल आव्हाळे व अविनाश जांभळकर यांनी तत्काळ टकमक किल्ला परिसरात स्थानिक व्यक्तींची मदत घेऊन अनेक तास डोंगराळ भागांमध्ये पर्यटकाचा शोध घेतला.