Vasai Virar local train pudhari photo
पालघर

Vasai Virar local train : वसई – नालासोपारा-विरार लोकलची गर्दी ठरतेय तारेवरची कसरत

नोकरदारांसाठी रोजचा प्रवास ठरतोय अग्निपरीक्षा!, वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता उपाययोजनांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : विश्वनाथ कुड्डू

मुंबईसह उपनगरातील प्रवाशांसाठी रोजचा लोक प्रवास म्हणजे एकप्रकारची तारेवरची कसरतच ठरत आहे. दिवसेंदिवस वाढणारी प्रवासी संख्या हा लोकल प्रवास अधिकच बिकट करत आहे. वसई, नालासोपारा आणि विरार येथून दररोज मुंबईकडे जाणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी लोकल ही केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर जगण्याची जीवनवाहिनी आहे. मात्र ही जीवनवाहिनी आज प्रचंड गर्दी, धक्काबुक्की आणि जीवघेण्या प्रवासामुळे त्रस्त झाली आहे.

पहाटेपासूनच स्टेशनवर प्रवाशांची झुंबड उडते. प्लॅटफॉ-र्मवरील लांबच लांब रांगा, खचाखच भरलेल्या गाड्या आणि दरवाज्याला लटकून करावा लागणारा प्रवास ही रोजचीच बाब झाली आहे. हा केवळ गैरसोयीचा प्रश्न नसून हजारो प्रवाशांच्या सुरक्षिततेशी निगडित गंभीर विषय आहे.

वसई-विरार परिसरातील कामगार, कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यावसायिक मुंबईच्या अर्थचक्राला गती देतात. तरीही वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे व बससेवेचा विस्तार अत्यंत अपुरा ठरत आहे. परिणामी नागरिकांना पर्याय नसल्याने लोकलवरच अवलंबून राहावे लागते. गर्दीच्या या धांदलीत धक्काबुक्की होत असल्याने हमरीतुमरीवर येणारे प्रवासी नंतर भांडणावर येतात. असे प्रसंग रोजच्या रोज घडतात.

उपाय फक्त काही गाड्या वाढविण्यात नाही. पीक अवरमध्ये अधिक लोकल फेऱ्या, उपनगरीय रेल्वेचा विस्तार, सक्षम बस कनेक्टिव्हिटी, स्टेशनचे आधुनि-कीकरण आणि सुरक्षित फीडर वाहतूक यांचे दीर्घकालीन नियोजन आवश्यक आहे. आता प्रश्न लोक-प्रतिनिधी आणि प्रशासनाला आहे- मुंबईच्या विकासासाठी रोज तासन्‌तास प्रवास करणाऱ्या या लाखो नागरिकांना सुरक्षित, सन्मा-नजनक आणि वेळेवर प्रवासाचा हक्क नेमका कधी मिळणार? वेळेवर धावणाऱ्या, पुरेशा आणि सुरक्षित लोकल हव्यात.

गर्दीच गर्दी असलेला प्रवास नकोसा वाटतो. त्यात बोरिवली ते अंधेरी दरम्यानच्या कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी स्थानकावरून कामावर विरार लोकलने जाताना एकतर बोरिवली किंवा अंधेरी स्थानकांवर उतरून पुन्हा स्लो लोकल पकडून प्रवास करताना दमछाक होते. यावर काहीतरी उपाय योजना व्हायला हवीअसे मत मुंबईतील एका आय टी अस्थापनात काम करणार्या युवकाने व्यक्त केले आहे.

दरम्यान वाढणार्या प्रवासी संख्येमुळे गर्दी, धक्काबुकीचे प्रमाण वाढत असून अनेक अपघातांच्या देखील घडत आहे. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर काहीजण जायबंदी झाले आहेत. यावर उपाय म्हणून लोकलच्या संख्येत वाढ केली आहे. मात्र ति देखील अपुरी पडत असल्यामुळे रेल्वे प्रवाशासाने यावर ठोस उपाय-योजना करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT