वसईत येणारा मुंबईचा कचरा, राडारोडा पाठवला माघारी pudhari photo
पालघर

Palghar News : वसईत येणारा मुंबईचा कचरा, राडारोडा पाठवला माघारी

भरारी पथकांच्या कारवाईचे स्वागत, कारवाई सतत सुरू ठेवण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : मुंबईहुन वसईत मोठ्या ट्रकवर लोड करून येणारा कचरा, माती, रॅबीट, राडारोडा हा घोडबंदर कडील वेशीवर अडवून नियुक्त केलेल्या भरारी पथकाने पुन्हा माघारी पाठवल्याने महामार्गाच्या कडेला असलेल्या स्थानिक गावकऱ्यांनी मोठे समाधान व्यक्त करून कारवाईचे स्वागत केले आहे. महामार्गाच्या कडांना राडारोडा, कचरा टाकल्याने सर्वात जास्त त्रास हा कडेच्या स्थानिकांना व शेतकऱ्यांना होतो. यासाठी ही कारवाई सतत सुरू ठेवावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईतून राडारोड्याने भरलेली वाहने वसई-विरारच्या भागात बिनधास्त आणून टाकली जात आहेत. हा राडारोडा वेशीवरच रोखण्यासाठी आता महामार्गावर पथके नियुक्त करून कारवाई सुरू केली आहे. वसई पूर्वेतून जाणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा मुंबई-गुजरातसह इतर शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे.

आधीच हा महामार्ग विविध समस्यांनी ग्रासला आहे. त्यातच मागील काही वर्षांपासून महामार्गावर राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. विशेषतः मुंबई यासह अन्य ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व अन्य विकास कामे झपाट्याने सुरू आहेत.

त्यामुळे खोदकाम, जुनी बांधकामे तोडणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राडा रोडा बाहेर निघत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई विरार शहराच्या हद्दीत आणून टाकला जात आहे.

रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गान मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार, विरार, खानिवडे अशा विविध ठिकाणी हा राडा रोडा विना रोखठोक टाकून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोलीस, तलाठी, प्राधिकरण, महापालिकेकडून संयुक्त कारवाई सुरू

दिवसेंदिवस वाढत असलेले राडारोड्यामुळे महामार्गावर पूरस्थिती व वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा वाहनांना शहराच्या वेशीवर रोखण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. या राडारोड्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी ही महसूल अधिकारी, पोलीस प्रशासन, महामार्ग प्राधिकरण, महापालिका यांनी संयुक्त कारवाई करावी असे सांगितले होते.

अखेर शहराच्या वेशीवरच घोडबंदर वर्सोवा पूल येथे पथके नियुक्त करून राडारोड्याने भरलेल्या वाहनांना अडवून माघारी पाठविले जात आहे. पोलीस, तलाठी, प्राधिकरण, महापालिका यांचे संयुक्त पथक नेमून ही कारवाई सुरू असल्याचे वसईचे तहसीलदार डॉ. अविनाश कोष्टी यांनी सांगितले आहे.

मुंबईच्या भागातून राडारोडा वसईच्या भागात येत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. तो राडारोडा रोखण्यासाठी आता पथके नेमून कारवाई सुरू आहे. वर्सोवा पूल, ससुनवघर या भागात ही पथके सक्रिय ठेवली आहेत.
डॉ अविनाश कोष्टी, तहसीलदार वसई.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT