खानिवडे: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी काही सुटेना. महामार्गावरील सातिवली येथील उड्डाणपुलाचे काम हाती घेतल्याने सध्या प्रवाशांना रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
महामार्गावरील शिरसाड - खानिवडे ते सातिवली अशी सुमारे 15 ते 20 किलोमीटर कोंडी शनिवारी सकाळी पाहावयास मिळाली. दरम्यान तानसा नदी पुलावरही सकाळी आठ वाजता लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले. या भागात रात्रीपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.रोज सकाळी संध्याकाळी होणारी ही वाहतूक कोंडी शालेय विद्यार्थी कामगार वर्ग यांना अत्यंत त्रासदायक होत आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आतापर्यंत अनेक सभा घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र वाहतूक कोंडी सोडवण्यास वाहतूक पोलीस, व पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असमर्थ ठरत आहेत. रोज रोज होणार्या वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या येथील ग्रामस्थांनी वाहतूक कोंडी सुटणार कधी असा सवाल प्रशासनाला केला आहे.