मुंबई-अहमदाबाद महामार्ग ठप्प : ४० किमीच्या रांगा pudhari photo
पालघर

Palghar News : मुंबई-अहमदाबाद महामार्ग ठप्प : ४० किमीच्या रांगा

पावसाचा तडाखा : दमणगंगा नदीवरील पूल पाण्याखाली, प्रवाशांचे मोठे हाल

पुढारी वृत्तसेवा

तलासरी : दक्षिण गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गुरुवारी तब्बल सहा तासांहून अधिक काळ ठप्प झाला. वापी येथील दमनगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली.

परिणामी मुंबईकडून गुजरातकडे तसेच गुजरातकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून, दोन्ही बाजूंना सुमारे ४० ते ५० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गेल्या २४ तासांपासून वलसाड, वापी आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच वरच्या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मधुबन धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे दमनगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि महामार्गावरील सखल भागातील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. महामार्ग बंद झाल्याने वापी, भिलाड, तलासरी, आच्छाड आणि मनोरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

या कोंडीत हजारो मालवाहू ट्रक, आंतरराज्यीय खासगी बस तसेच शेकडो खासगी वाहने अडकून पडली आहेत. सहा ते सात तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी, अन्नपदार्थ आणि इतर अत्यावश्यक सुविधांचा तुटवडा जाणवत असून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. दमनगंगा नदीची पाणीपातळी हळूहळू ओसरत असली, तरी पूल पूर्णपणे पाण्याबाहेर येऊन त्याची सुरक्षितता तपासल्यानंतरच महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT