पालघर ः मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या गुजराती भाषेत असल्यामुळे महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश करताना गुजरातमध्ये आल्याचा भास होत आहे.महामार्गा लगतच्या मीरा रोड मध्ये हिंदीच्या सक्ती विरोधात आंदोलने होत असताना महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गुजराती पाट्याविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालया कडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. तसेच मराठी भाषेचा कैवार घेणारी मनसे गुजराती पाट्याविरोधात भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महामार्गाच्या गुजरातीकरणा बाबत खासदार शरद पवार यांच्या सह अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.मराठी भाषेतील पाट्या लावणे बंधनकारक असताना गुजराती पाट्या लावणार्या हॉटेलांवर कारवाईची केली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचे 2002 मध्ये चौपदरीकरण आणि त्यानंतर सहापदरीकरण झाल्याने महामार्गावरील वाहनांच्या वर्दळीत वाढ झाली आहे.परिणामी महामार्गावर वाहनचालक आणि प्रवाश्यांना आराम,अल्पोपहार आणि जेवण आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यार्या हॉटेल्स मध्ये वाढ झाली.त्यामुळे महामार्गावर घोडबंदर पासून गुजरातच्या हद्दीपर्यंत मोठ्या प्रमाणात हॉटेल उभी राहिल्याने महामार्गावर हॉटेल व्यवसाय फोफावला आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा खाडी पासून गुजरात राज्याच्या हद्दीपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूस हॉटेल उभी राहिल्याने हॉटेल व्यवसायाने जोम धरला आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर गुजरात राज्याची सीमा सुरु होते. तसेच महामार्गावरून मोठ्या प्रमाणात गुजराती आणि अन्य भाषिक चालक आणि प्रवाशी प्रवास करीत असतात. हॉटेलांचे मालक महाराष्ट्राबाहेरचे आणि मोठ्या संख्येने गुजरात राज्यातील आहेत.त्यामुळे गुजराती भाषिक गिर्हाईकांना हॉटेलमध्ये आकर्षित करण्यासाठीपाट्या गुजराती भाषेत लावण्याची स्पर्धा हॉटेल मालकांमध्ये निर्माण झाली आहे.
मुंबई दुकाने संस्था अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्यात व्यवसाय करणार्या संस्थांना मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे.परंतु कायद्याला धाब्यावर बसवून महामार्गावरील अनेक हॉटेल चालकांनी त्यांच्या हॉटेल्सच्या पाट्या मराठी भाषेऐवजी गुजराती भाषेत लावल्या आहेत.महाराष्ट्रात व्यवसाय करीत असताना हॉटेल चालकांकडून मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला जात आहे.त्यामुळे मराठी भाषेचा अवमान आणि कायद्याचे उल्लंघन करणार्या हॉटेल चालकांवर कारवाईची मागणी पुढे येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आठ वर्षांपूर्वी (2017) महामार्गावरून मोटारीने पालघरच्या दौर्यावर आले होते. प्रवासा दरम्यान महामार्गावरील हॉटेलांच्या गुजराती भाषेतील पाट्या पाहून महामार्गाच्या गुजरातीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2019 च्या शिवाजी पार्कवरील गुढी पाडव्याच्या सभेत महामार्गावरील गुजराती पाट्यांचा मुद्दा उपस्थित केला होता.त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी वसई तालुक्याच्या हद्दीत आंदोलन करून हॉटेलच्या गुजराती पाट्यांची तोडफोड केली होती.
दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यामुळे गुजराती पाट्या विरोधात कोणतीही कारवाई अथवा आंदोलन झाल्याचे समोर आलेले नाही.