Water Tanker Pudhari File photo
पालघर

Water Crisis: मोखाडा तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट ,19 गाव-पाडे 9 टँकरवर

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा: दरवर्षीप्रमाणे यंदाही मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून फेब्रुवारी संपताच टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात अनेक आदिवासी गावांना अजूनही कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची सुविधा मिळालेली नाही. परिणामी सध्या तालुक्यातील 19 गाव-पाड्यांना 9 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असून दररोज सुमारे 19 फेर्या मारून नागरिकांची तहान भागवली जात आहे.

मोखाडा हा अतिदुर्गम व डोंगराळ भाग असल्याने दरवर्षी पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होते. खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोर्हांडा आदी भागांच्या आसपास मोठी धरणे असतानाही स्थानिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

“उशाला धरणे आणि घशाला कोरडेपणा” अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात जल जीवन मिशनसारख्या महत्त्वाकांक्षी योजना काही ठिकाणी राबवण्यात आल्या असल्या, तरी अनेक गावांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचलेला नाही.

धामणशेत, चास, गोमघर आदी ठिकाणी नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात नागरिकांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने टँकरची मागणीही वाढत असून पाणीपुरवठा विभागावर मोठा ताण निर्माण झाला आहे.

जलयुक्त शिवार, ठक्कर बाप्पा योजना, विविध बंधारे, विहिरी, शेततळी आदी कामांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे; मात्र त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT