Mokhada Ganeshotsav Pudhari
पालघर

Mokhada Ganeshotsav: शिवसेना फुटली मात्र 'बाप्पा' साठी दोन्ही शिवसैनिक आजही एकत्र

मोखाड्यातील दोन्ही शिवसेनेकडून गणेश उत्सव होतोय एकत्रित साजरा

पुढारी वृत्तसेवा

हनीफ शेख

पालघर: 2022 मध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आणि शिवसेना पक्ष कुठला यामध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्हीकडून खरी शिवसेना कोणाची याबाबत कायदेशीर लढाई सुरू झाली.

यानंतर अनेक ठिकाणी शिवसेनेच्या मालकीची किंवा विविध भागात असलेली कार्यालय कोण घेणार यावरून देखील स्थानिक पातळीवर वाद-विवाद झाले यातून जो वरचढ ठरला त्या शिवसेनेने त्या कार्यालयांचा ताबा घेतला यानंतर बऱ्याच दिवस दोन्ही शिवसेना एकत्रित असलेल्या अनेक वास्तू परंपरा याबाबतीत दावेप्रतिदावे सुरू राहिले.

मात्र या सगळ्यांमध्ये एक आदर्श ठरणारी बाब समोर आली असून शिवसेना फुटी नंतर देखील मोखाडा तालुक्यातील शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सव मात्र आज चार वर्षानंतर देखील दोन्ही शिवसैनिक एकत्र येऊन साजरा करीत असल्याचे दिसून येत आहे.

कोणताही वाद-विवाद न करता संबंधित जागेवर दावा न करता हा गणेशोत्सव एका वर्षी ठाकरेंची शिवसेना तर दुसऱ्या वरती शिंदे यांची शिवसेना याचा कारभार पाहते मात्र आरतीपासून विसर्जनापर्यंत दोन्ही शिवसैनिक यामध्ये पूर्णपणे सहभागी होतात हे नक्की यामुळे राज्यात आज शिवसेना फुटली असली तरी या गणेश उत्सवाच्या निमित्ताने शिवसैनिक मात्र आजही एकच असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

1966 मध्ये शिवसेना मुंबई स्थापन झाली यानंतर राज्यभर तिचा विस्तार होत गेला 1985 साली मोखाडा तालुक्यात देखील शिवसेना शाखा उघडण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली यावेळी जुने शिवसैनिक राजन भाई वैद्य ,प्रकाश लोखंडे, राजाराम काळे, दत्तू काका कोठेकर या जुन्या शिवसैनिकांनी या भागात सर्वात अगोदर शिवसेना शाखा उघडली यानंतर अनेक ज्येष्ठ शिवसैनिक एकत्र आले आणि शिवसेनेची पालेमुळे मोखाडा तालुक्यात रुजविण्यात आली.

यानंतर लोक एकत्रित यावे म्हणून या शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात मोखाडा तालुक्यातील मुख्य रस्त्यावर असलेल्या शारदा मंदिर या ठिकाणी केली. आज मोखाडा तालुक्यातील सर्वात मोठा गणेश उत्सव म्हणून या मंडळाकडे बघितले जाते. यानंतर 2022 मध्ये शिवसेना फुटल्यानंतर या गणेश मंडळावर आणि त्या जागेवर दोन्ही शिवसेनेकडून दावा करण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणावर बैठका झाल्या.

यावेळी दोन्ही शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यावर एक मार्ग काढला की दरवर्षी गणेशाची स्थापना ते विसर्जन याचं नियोजन एक शिवसेना करेल असं दरवर्षी आलटून पालटून या नियोजनाचा कारभार फक्त एका शिवसेनेकडे राहील.

मात्र आरती पासून विसर्जनापर्यंत तसेच विविध उपक्रमात दोन्ही शिवसैनिक एकत्र राहतील यावर सगळ्यांच एकमत झाले आणि गेल्या चार वर्षापासून हा गणेशोत्सव दोन्ही शिवसैनिक एकत्र येऊन मोठ्या दिमाखात साजरा करीत आहेत.

तत्कालीन जुने शिवसैनिक पांडुरंग चौधरी,रवींद्र कटिलकर प्रकाश पटेल यांच्याबरोबरच आता नवीन फळीतील शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अमोल पाटील तर ठाकरे गटाचे दिलीप बांडे, दिलीप मोहंडकर अगदी ग्रामीण भागातील दोन्ही शिवसेनेचे शिवसैनिक या उत्सवात मोठ्या संख्येने मनोभावे सामील होतात.

कोणत्याही उत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्रित येतात यासाठी आमच्या तत्कालीन जेष्ठ शिवसैनिकांनी या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना मोखाड्यात केली तोच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत दोन्ही शिवसेना मिळून नियोजन करतात यामध्ये कसलाही किंतू परंतु नसतो महत्त्वाचे म्हणजे 1985 पासून सुरू असलेली परंपरा यापुढेही कित्येक वर्ष अखंडीत चालू राहील हाच आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे.
- अमोल पाटील, तालुकाप्रमुख शिवसेना मोखाडा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT