मोखाडा : मोखाडा तालुक्यातील आहे त्या आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असताना सरकार मात्र नुसत्या नव्या घोषणा कारीत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. तसा शासकीय आदेश काढण्यात आला. यावरून महायुतीच्या मित्रपक्षांतच श्रेयवाद सुरू झाल्याचे पहावयास मिळाले. मात्र दर्जा दिला अन् लागलीच आरोग्य व्यवस्था वाढली किंवा सुरू झाली असे होत नाही. कारण मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला २०१३ साली उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला मात्र आज ११ वर्षानंतरही यावर पुढे बांधकाम संदर्भात म्हणा किंवा ३० खाटांचे किमान ५० खाटांची परवानगी सुध्दा मिळालेली नाही. पर्यायाने सर्व व्यवस्था आरोग्य कर्मचारी हे ग्रामीण रुग्णालयाच्या निकष नुसारच राहीले उलट त्यातही अनेक पदे रिक्त राहत असल्याने आरोग्याची आबाळ झालेली आहे.
असे असताना आता खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला मात्र यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही आणि त्या सुविधा मिळण्यासाठी जर वर्षानुवर्षे वाट पहावी लागणार असेल तर नुसते दर्जा नको प्रत्यक्षात कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा येथील नागरीक व्यक्त करीत आहेत. मोखाडा ग्रामीण रुग्णालयावर संपूर्ण तालुक्याची भिस्त आहे. यामुळे तालुक्यातील दूसरा मोठा विभागात म्हणून खोडाळा ग्रामपंचायत कडे पाहिले जाते. यामुळे येथील लोकांना जर मोखाडा ग्रामीण रुग्णालय गाठायचे असेल तर किमान, २०ते ३० किमीचा प्रवास करावा लागतो हे लक्षात घेता खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे ही जुनीच मागणी येथील जनतेची होती तिला आता मान्यता मिळाली आहे कदाचीत काही वर्षांत याला मूर्त रूप येईल मात्र हा आदेश प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रमाणे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे तो अनाठायी आहे कारण आदेश निघाला की थेट पद भरती किंवा खाटांची संख्या वाढत नाही कारण की आता हक्काची जागा असण किंवा जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सिव्हील सर्जनकडे वर्ग होणे, यानंतर अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला दुसरी जागा मिळणे जर आहे ती प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा जर घेतली तर सुरवातीला २५ टक्के पद भरून काम चालू करणे असे विविध दिव्य यावेळी पार करावे लागत असते.
२०१३ ला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवलेल्या ग्रामीण रुग्णालय मोखाड्याचा प्रस्ताव अजूनही मंत्रालय स्तरावर पडून आहे. किमान ५० खाटांची परवानगी द्यावी ही मागणी जिल्ह्याला पडून आहे. यामुळे अनेक पद रिक्त आहेत पद वाढवणे आवश्यक असताना आहे ती पदे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्या भरवशावर चालवली जात आहेत आज एकाच वैद्यकीय अधीक्षकावर जव्हार आणि मोखाडा दोन्ही रुग्णालयाचा भार आहे अशी स्थिती असताना नुसता ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाल्या नंतर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यात काय अर्थ आहे? हा खरा सवाल आहे.
मोखाड्याची स्थिती सोडा ज्या खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला तिथे गेल्या दोन वर्षांपासून कायम स्वरुपी वैद्यकीय अधिकारी मिळालेला नाही. सर्पदंशामुळे एका लहानग्याचा मृत्यू झाल्यानंतर हे केंद्र गोत्यात आले होते त्यावेळी तत्कालीन वैद्यकीय अधिकारी यांची बदली करण्यात आली. सध्या तालुका आरोग्य अधिकारी आणि एका कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर येथील भार आहे मात्र तालुका आरोग्य अधिकारी तालुक्याचा कारभार पाहतील बैठका मीटिंग करतील की इकडे बघतील या विवंचनेत आहे याशिवाय ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली करण्यात आली त्याचा पगार मात्र खोडाळा येथेच निघत असल्याने ती जागा शासन स्तरावर रिक्त दिसत नसल्याने तिथे नवीन अधिकारी येऊ शकणार नाही मग येथील नागरिकांनी नेमके करायचे कायय हा प्रश्न आहे. कारण मुळात केंद्रात राज्यात आणि जिल्हयात सुध्दा सत्तेत असलेल्या महायुतीच्या लोकप्रतिनिधीनी या गंभीर बाबीकडे अगोदर लक्ष देणे आवश्यक असताना आवश्यक पदे भरणे, चांगली आरोग्य सेवा देणे आवश्यक असताना नुसत्याच कागदावर मिळालेल्या दर्जाला घेवुन मिरवणे म्हणजे आपल्याच लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे.