आंबेपाना या पाड्यातील लहानी तुंबडा या महिलेचे घर पहाटेच्या सुमारास पडल्याने मोठे नुकसान झाले. pudhari photo
पालघर

Mokhada rainfall damage : पावसाच्या संततधारेने मोखाड्यात घर पडले ; सुदैवाने जीवित हानी टळली

शासनाकडून भरपाईची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मोखाडा: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घातले असून ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे. याचमुळे मोखाडा नगरपंचायत क्षेत्रातील आंबेपाना या पाड्यातील लहानी तुंबडा या महिलेचे घर पहाटेच्या सुमारास पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सुदैवाने घरातील सर्व सदस्य एका बाजूला झोपलेले होते आणि घराची दुसरी बाजू ज्या ठिकाणी स्वयंपाक केला जात होता ती बाजू पडल्याने जीवित हानी टळली. मात्र अन्नधान्य आणि घराचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या घराचा तात्काळ पंचनामा करून शासनाकडून भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोठी जीवितहानी टळली

गणेश विसर्जनानंतर त्याच पहाटे तुंबडा कुटुंबातील एकूण सहा सदस्य आपल्या घरात झोपलेले असताना पहाटेच्या सुमारास ही घटना घडली सुदैवाने ज्या जागी तुंबडा कुटुंबीय झोपले होते ती बाजू न पडता स्वयंपाक करीत असलेल्या जागेवरचे छत अचानक कोसळले. ही घटना जर दिवसा घडली असती तर दुखापत होण्याची सुद्धा चिन्हे होती. मात्र पहाटेच्या सुमारास स्वयंपाक घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

या ठिकाणी ठेवलेले अन्नधान्य आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामा होईलही मात्र सरकारी काम आणि वर्षभर थांब अशी स्थिती असल्याने या कुटुंबाला पुन्हा उभं राहण्यासाठी तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.

या घटनेची माहिती मिळताच मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील आणि उपनगराध्यक्ष नुसूदिगा यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी या कुटुंबांना भरीव आर्थिक मदत देखील करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT