दत्तात्रय उबाळे pudhari photo
पालघर

Palghar News : मुलीच्या लग्नात वडिलांची सावली हरपली

मुलीच्या लग्नात वडिलांचे निधन,मोखाड्यातील काळजाला पिळ देणारी घटना

पुढारी वृत्तसेवा

पालघर : हनिफ शेख

मोखाडा तालुक्यातील एका लग्नसोहळ्यावर काळाने अशी झडप घातली की आनंदाच्या घरात क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या वडिलांचेच मुलीच्या लग्नदिवशी निधन झाल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे. मुलीच्या हातातील मेहंदी सुकण्याआधीच वडिलांची सावली हरपल्याची ही हृदयद्रावक घटना मोखाड्यात घडली.

मोखाडा तालुक्यातील दत्तात्रय उबाळे (60) यांच्या तिसऱ्या मुलीचा सोहळा मोखाडा येथे काल 10 मे रोजी पार पडला. या सोहळ्याच्या दिवशी स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणि इतर धावपळ देखील करत असताना उबाळे यांची प्रकृती खालावली. म्हणून त्यांना मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिक या ठिकाणी हलवण्यात आले आणि तिथेच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

ही बातमी मंडपात पसरली. मात्र लग्नकार्याची घटिकामी आली होती सर्व पाहुणे जमले होते.अशावेळी लग्न थांबवणे उचित नसल्याने वडील उपचार घेत आहेत असे सांगत हे लग्न कार्य पार पाडले. यानंतर देखील उशिरापर्यंत नवरी मुलीला याबाबतची कल्पना देण्यात आली नव्हती. मुलीच्या लग्नासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केलेला बाप अक्षदा टाकायला नव्हता या हृदयद्रावक घटनेने सगळेच स्तब्ध झाले आहेत.

दत्तात्रय उबाळे हे तहसील कार्यालयात नोकरीस होते.वयोमानानुसार सेवानिवृत्ती घेतल्यानंतर चार मुलींचे वडील असलेले उबळे यांनी आपल्या दोन मुलींचे लग्न या आधी केलेले आहे. हर्षदाही त्यांची तिसरी मुलगी होती. यासाठी गेल्या महिनाभरापासून लग्न तयारी त्यांची लगबग होती. एवढेच काय तर शनिवारी 9 मे रोजी आपल्या मुलीच्या हळदीचा कार्यक्रम देखील त्यांनी जोरात पार पाडला.

यानंतर काल दहा मे रोजी दुपारी लग्न होते. मात्र त्याआधीच 11 वाजेच्या आसपास त्यांना अस्वस्थ जाणू लागल्याने त्यांनी घरात आराम केला. मात्र तरीही बरं वाटत नसल्याने त्यांची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी जावई आणि नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

ही घटना नवरी मुलीला कळाली मात्र उपचार सुरू आहेत, यामुळे लग्नकार्य थांबविण्यापेक्षा ते उरकून घेऊ ते लवकरच उपचार करून घरी परत येतील, अशी समज सर्व नातेवाईकांनी दिल्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हे लग्न कार्य पार पाडले. यानंतर तीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने लग्नाचा आनंद क्षणात दुःखात बदलला नातेवाईक आणि पाहुण्यांना देखील अश्रू अनावर झाल्याचे हृदयद्यावक चित्र मंडपस्थळी दिसून आले.

लेकराच्या डोक्यावर अक्षदा टाकायची राहिलीच

उबाळेंनी आपल्या नोकरीच्या काळात देखील आणि सेवानिवृत्तीनंतर देखील आपले नातेवाईक ग्रामस्थ या सर्वांच्या हृदयात एक वेगळे घर निर्माण केले होते. अतिशय धार्मिक असलेली उबाळे यांचा कोणाशीही तसा वाद विवाद नसल्याने यांच्या लग्नकार्यात आणि हळदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक आणि नातेवाईकांची गर्दी होती. या आनंद सोहळ्यामध्ये घरात आनंदाचे वातावरण होते. आणि अशातच चार मुलींचे वडील उबाळे देखील अतिशय आनंदी होते. भरल्या डोळ्याने आपल्या मुलीची वरात आपल्या दारातून जाताना पाहणे, हे प्रत्येक बापाचे भाग्य असते मात्र उबाळे यांना त्याआधीच देवाज्ञा झाल्याने त्यांना हा सोहळा पाहता आला नाही. मुलीच्या हातातील मेहंदी सुकण्याआधीच वडिलांची सावली हरपली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT