पालघर

स्थलांतरित मजुरांची गावाकडे परतीची वाटचाल, महामार्गावरील नाक्यांवर शेकडो कुटुंबांची गर्दी

वीटभट्टी, शेती, बांधकामातून कमावलेली गाठोडी घेऊन मजूर पुन्हा मूळ गावी

पुढारी वृत्तसेवा

खानिवडे : पालघर जिल्ह्याचे आर्थिक केंद्र मानल्या जाणाऱ्या वसई तालुक्यात रोजगाराच्या शोधात दरवर्षी हजारो मजूर तात्पुरते स्थलांतर करून येतात. वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणू, जव्हार आणि मोखाडा या आदिवासी बहुल तालुक्यांतून दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात मजूर कुटुंबे वसईकडे येत असतात. वीटभट्ट्या, शेतीवाडी, बांधकाम, मिठागरे, तसेच वसई अर्नाळा परिसरातील मासेमारी व्यवसायात हे मजूर सहा महिन्यांपर्यंत काम करून उदरनिर्वाह करतात.

आता पावसाळ्याची चाहूल लागताच हीच मजूर कुटुंबे पुन्हा आपल्या मूळ गावी परतू लागली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विविध नाक्यांवर कुटुंबीयांसह संसाराचा सामानाचा बोजा घेऊन वाहनांच्या प्रतीक्षेत उभे असलेले शेकडो मजूर सध्या पाहायला मिळत आहेत. मागील दोन दिवसांपासून हे चित्र अधिक ठळकपणे दिसून येत आहे.

पावसाळ्यात बहुतांश मजूर आपल्या गावी शेती लागवडीच्या कामात गुंततात. ज्यांच्याकडे शेती नाही, ते गावातील उपलब्ध मजुरीची कामे करतात. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा रोजगारासाठी वसईकडे स्थलांतर करण्याची त्यांची वार्षिक परंपरा कायम आहे.

दरम्यान, काही रोजंदारी मजूर रोज सकाळी वसईतील ठराविक नाक्यांवर कामाच्या शोधात उभे राहत असतात. शेतकरी, बांधकाम कंत्राटदार, भाजीपाला उत्पादक, मच्छीमार आदी येथे येऊन दिवसाच्या मजुरीसाठी कामगारांना घेऊन जातात. मात्र आता पावसाळा जवळ आल्याने या नाक्यांवरील गर्दी कमी होत असून स्थलांतरित मजुरांची पावले पुन्हा गावाकडे वळताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT