Metro Line 13 Pudhari
पालघर

Metro Line 13: मीरा-भाईंदर-वसई-विरार मेट्रोला मंजुरी; १७ हजार कोटींचा प्रकल्प, ४.९२ किमीचा सहापदरी पूल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

पुढारी वृत्तसेवा

विरार: मीरा-भाईंदर ते वसई-विरार दरम्यानच्या लाखो नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका क्रमांक १३ला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तब्बल १७ हजार ७२४.९९ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणारा ठरणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून, मेट्रो-१३ची एकूण लांबी २५.०३ किलोमीटर असेल. हा मार्ग ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांतून जाणार आहे.

मेट्रो-१३च्या एकूण २५.०३ किलोमीटर मार्गापैकी २१.७८ किलोमीटर मार्ग उन्नत, तर ३.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत असणार आहे. या मार्गावर एकूण १६ स्थानके उभारली जाणार असून, त्यापैकी १३ स्थानके उन्नत आणि तीन स्थानके भूमिगत असतील.

मीरा रोडपासून सुरू होणारा हा मार्ग वसई, नायगाव, नालासोपारा आणि विरार या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. त्यामुळे सध्या रस्ते आणि रेल्वेवर अवलंबून असलेल्या वसई-विरारमधील प्रवाशांना मीरा-भाईंदरच्या दिशेने जाण्यासाठी स्वतंत्र आणि वेगवान सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

या प्रकल्पाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे वसई खाडीवरील ४.९२ किमी लांबीचा एकात्मिक सहापदरी रस्ता-मेट्रो पूल. या पुलाच्या माध्यमातून पांजू बेटाला जोडणी मिळणार असून, मेट्रोबरोबरच रस्ते वाहतुकीलाही त्याचा फायदा होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT