Married Woman Suspicious Death Kelva Beach Resort Incident
पालघर: पर्यटनासाठी सुरक्षित व प्रसिद्ध असलेल्या केळवे समुद्रकिनारा भागात दऱ्या निवास या न्याहारी निवास रिसॉर्टमध्ये आलेल्या प्रियकरासोबत आलेल्या विवाहित महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. महिलेच्या कानातून रक्तस्त्राव झाल्याने हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. केळवे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे केळवे येथील गैरप्रकार पुन्हा चर्चेत आला आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही घटना दुर्दैवी असल्याचे मत हॉटेल मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
विरार आगाशी येथे राहणारी सत्तावीस वर्षीय प्रियंका पवार ही मृत झालेली विवाहित महिला तिचा पंचवीस वर्षीय अविवाहित प्रियकर मयूर साळुंखे याच्यासह केळवे येथे वास्तव्याला होती. त्यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. दरम्यान, काल संध्याकाळी तिला श्वसनाचा त्रास झाल्यानंतर माहीम येथील प्राथमिक उपचार केंद्रात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे घोषित केले. सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन केले.
अहवालानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृत महिलेची माहिती केळवे पोलिसांना मिळाली. त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत महिलेच्या कानामधून रक्तस्राव झाल्याने तिच्या नातेवाईकानी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी पोलिसांकडे केली आहे. मृत प्रियंकाचा प्रियकर मयूर हा मूळचा विरार येथील राहणारा असून तो बोईसर येथे कामाला आहे. पुढील तपास सुरु केल्याचे केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी विजया गोस्वामी यांनी सांगितले.