पालघर : मनोर ग्रामीण रुग्णालयात गेल्या पाच दिवसांपासून पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होत आहेत. स्वच्छतागृहात पाणी नसल्याने नैसर्गिक विधीसाठी रुग्णालयात दाखल रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा रुग्णालयात सामना करावा लागत आहे. ग्रामीण बाळंतपणानंतर उपचारासाठी दाखल असलेल्या पंधरा बाळंत महिलांची मोठी कुचंबना होत आहे.
रुग्णांना पिण्याच्या पाण्यासह नैसर्गिक विधीसाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. पाण्याअभावी रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
मनोर ग्रामीण रुग्णालयाला मनोर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतुन पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयाला पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
पाणीपुरवठा बंद झाल्याने ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रुग्णालयातील स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांवर पन्नास मीटर अंतरावर असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयाचा करण्याची वेळ आली आहे. गंभीर रुग्णांचे हाल होत असुन नवजात बालकांसह दाखल असलेल्या बाळंत महिलांची मोठी कुचंबना होत आहे. पाण्याअभावी रुग्णालयाचे नियमित कामकाज आणि आरोग्यसेवेच्या दर्जावर परिणाम होत आहे.
पाण्याअभावी स्वच्छतेवर परिणाम
सद्यस्थितीत मनोर ग्रामीण रुग्णालयात तेरा बाळंत महिला पंधरा पुरुष रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. दररोज शंभर पेक्षा अधिक बाह्यरुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. गेल्या महिन्यात ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बाह्य रुग्णांची चार हजार पेक्षा अधिक होती. पाण्याअभावी स्वच्छतेवर परिणाम होत असुन संसर्गजन्य आजारांचा प्रसार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने ग्रामीण रुग्णालयाचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे.
जलवाहिनी मध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. जलवाहीनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असुन टँकर मार्फत पाणीपुरवठा करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.डॉ. राजगुरू, प्रभारी अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मनोर,
ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेतुन ग्रामीण रुग्णालयाला थेट पाणीपुरवठा केला जातो. रुग्णालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाइन मध्ये अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.चेतन पाटील, सरपंच, ग्रामपंचायत-मनोर.