पालघर : पालघर जिल्ह्यातील मनोर वनपरिक्षेत्रात लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीचे नुकसान झाले आहे. टाकमाईदेवी डोंगर परिसरात लागलेला वणवा वेगाने पसरत असून संपूर्ण जंगल आगीच्या विळख्यात सापडले आहे. सद्य स्थितीत तापमानाचा पारा वाढला आहे, अशात जोरदार वाऱ्यामुळे आगीची तीव्रता वाढत असल्यामुळे वणवा नियंत्रणात आणणे कठीण ठरत आहे.
वन विभागाचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि स्वयंसेवक जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आवश्यक त्या अत्याधुनिक साधनसामग्रीचा अभाव असल्यामुळे आग विझवण्याचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. डोंगरमाथ्यावर लागलेली आग आता हळूहळू पायथ्याच्या भागाकडे सरकत असून टेन, टाकवहाल आणि सावरखंड ग्रामपंचायत हद्दीतील जंगलात वणव्याचा फैलाव झाला आहे.
वणव्यात जंगलातील झाडे, वनस्पती आणि जैवविविधतेचे नुकसान तसेच र्यावरणाची मोठी हानी झाली आहे.जंगलातील आग शेतकऱ्यांच्या शेतीकडे सरकत असल्यामुळे शेतातील उभ्या पिकांना धोका निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जंगलात लागणारे वणवे रोखण्यासाठी फायर लाईन तसेच अन्य उपाययोजना करण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. त्यानंतरही जंगलाला लागणारे वणवे रोखण्यात अपयश येत असल्याने पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडे सक्षम आणि आधुनिक यंत्रणा नसल्याने शेकडो हेक्टर जंगल जळून खाक होत आहे.
ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी...
वणव्यात जंगल होरपळत असताना वनविभागाकडून वणवे रोखण्यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी केली जात आहे. वणव्यांवर नियंत्रण आणून वनक्षेत्र राखण्या सह पर्यावरण रक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.