विक्रमगड :
सध्या तापमान वाढीमुळे जंगलात वनव्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातच महावितरणच्या निष्काळजीपणामुळे देखील अनेक ठिकाणी वनवे लागत असल्याचे चित्रदेखील बघायला मिळत आहे. यामुळे जंगलांचे नुकसान तर होतेच मात्र शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बघायला मिळत आहे.
सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांच्या मालकीच्या देहेर्जे येथील गट नंबर ९२/२ मध्ये तिन ते चार वर्षापुर्वी लागवड केलेले व उत्पन्न देत असलेली एक हजार कलमी आंब्यांची झाडे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे या आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. निलेश सांबरे यांच्या जागेतून महावितरणची विद्युत वाहने केली असून या विद्युत वाहिन्या खूपच सैल आणि लोंबकल्या आहेत.
जोरदार वारा आल्याने या विद्युत वाहिन्या एकमेकांना स्पर्श झाल्याने आग लागल्याचे अर्जदाराने अर्जात नमूद केले असून यामुळे वनवा भडकला आणि या आगीत आंब्याची झाडे जळून खाक झाली याबाबत निलेश सांबरे यांनी विक्रमगड तहसील कार्यालय आणि विक्रमगड पोलीस कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली असून यामध्ये महावितरणाचे अधिकारी व कर्मचारी याच्या निष्काळजीपणामुळे घडली असल्याचा आरोप या यावेळी केला असून लाखो रुपयांचे व कधीही न भरून येणारे नुकसान झाले असल्याचे म्हटले आहे.
सदरील प्रकार हा महाविरण अधिकारी व कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याने याची सखोल चौकशी करुन दोषीवर गुन्हे दाखल करावेत.-निलेश सांबरे, संस्थापक जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था