तलासरी : तालुक्यात सध्या भात शेती लागवडीचा हंगाम सुरु असुन दिवसेदिवस मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे भात शेती करणे आर्थिक दृष्ट्या खर्चाचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर भात लागवड अधिक सुलभ आणि आर्थिक दृष्ट्या किफायतशिर व्हावी यासाठी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याचे तंत्रज्ञान आजच्या काळाची गरज झाली आहे.
तलासरी तालुक्यातील मौजे-कोचाई मसानगांव येथिल शेतकरी भिखू देवाजी वळवी यांच्या शेतावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याचे प्रात्याक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी तालुका कृषि अधिकारी आर. यु इभाड, मंडळ कृषी अधिकारी, राहुल गायकवाड, उप कृषि अधिकारी संजय जगताप, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश दळवी व भूपेश वरठा आणि परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे सविस्तर मार्गदर्शन करुन प्रात्याक्षिक घेण्यात आले.
नरेशवाडी येथील रोप वाटिकेत भाताचे रोप तयार करण्यात आले होते. पंधरा दिवसाचे रोप यांत्रिकी पद्धतीने मशीनच्या साह्याने लागवड करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहयाने भातशेतीच्या कार्यक्षमतेत वाढ, मजुरांवरील अवलंबीत्व कमी करणे आणि वेळ व श्रम वाचविने यांत्रिक पद्धतीने लागवड केल्याने शक्य झाले आहे.
यंत्राद्वारे भात लागवड करण्यासाठी ट्रे मध्ये रोपे तयार करावी लागत असल्याने रोपवाटीकेसाठी राब करणे, आवश्यकता नसल्यामुळे खर्च कमी करून दर्जेदार रोपे तयार करणे सुलभ होते. तरी तलासरी मधील शेतक-यांनी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करावी असे यावेळी आवाहन करण्यात आले. यांत्रिकीकरण पद्धतीत मजूर कमी लागतात व रोपवाटिकेचा खर्च सुद्धा कमी होतो, त्यामुळे शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
कमी वेळेत अधिक क्षेत्रावर लागवड शक्य, रोपे समान अंतरावर लावली जातात त्यामुळे पिक एकसंघ उगम होते, उत्पादकतेत 15 ते 20 टक्के वाढ होते, मजुरांची आवश्यकता कमी होते, खत व्यवस्थापन व किडरोग व्यवस्थापन सुलभ होते.