विरार (पालघर) : वसई मधील ससूनगर परिसरातील एका आरएमसी प्लांटमध्ये झालेल्या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत दम घुटल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे.
आरएमसी प्लांट परिसरात ३० फूट खोल आणि ५ फूट रुंद अशा सिमेंटच्या कोरड्या विहिरीत ही दुर्घटना घडली. ठेकेदार अजय लालसाह यादव (३१) यांच्या देखरेखीखाली काम सुरू असताना, गळून पडलेला बॉल बाहेर काढण्यासाठी २० वर्षीय मजूर विश्वजीत हरिचंद राजभर याला कोणत्याही सुरक्षात्मक साधनांशिवाय खाली उतरवण्यात आले. विहिरीत ऑक्सिजनची कमतरता असल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी पुढे गेलेला दुसरा मजूर राजन सुरेंद्र राजभर (२४) आणि नंतर त्यांच्यामागे गेलेला सलमान खान हेदेखील कोणत्याही सुरक्षात्मक साधनांशिवाय खाली उतरले. तिघेही श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाले. लगेच मशीनच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले; मात्र विश्वजीत आणि राजन यांचा मृत्यू झाला होता. सलमान खान याची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर मृत मजुरांच्या नातेवाईकांनी ठेकेदारावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा व्यवस्था न केल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, नायगाव पोलिसांनी ठेकेदार अजय यादव याच्याविरुद्ध निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.