पालघर : तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर एका मांजरीचे पिल्लू चक्क शंभर फूट खोल बोरवेलमधून बाहेर काढण्यात आले. अर्थात या बोरवेलमध्ये पडलेल्या या पिल्लूला प्राणीमित्रांच्या अथक प्रयत्नानंतर विविध शक्कला लढवून बाहेर काढण्यात आले. ही घटना पालघर शहरानजीक असलेल्या सुंदरम शाळेजवळील वर्धमान इमारत परिसरात घडली. (Palghar News)
इमारत परिसरात एक मांजर व तिची तीन पिल्ले खेळत बागडत असताना एक पिल्लू अचानक उघड्या बोरवेलच्या खोल शंभर फूट पाईपमध्ये पडले. काहींना ही बाब लक्षात येताच त्यांनी पालघरमधील प्राणीमित्रांना ही बाब सांगितली. त्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र पाईप असल्याने पिल्लू बाहेर येण्यात अनेक अडचणी येत होत्या. कडक उन्हात प्राणीमित्रांनी पिल्लूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.
अखेर एका लोखंडी सळईला काही खिळे वेगवेगळ्या दिशेने वेल्डिंग करून (जॉ रॉड) ती पाईपमध्ये खोलवर खाली सोडण्यात आली. त्या रॉडवर मांजरीचे पिल्लू अडकले व तिला अलगदवर खेचून तिची सुखरूप सुटका केली गेली. प्राणीमित्र प्रशांत मानकर व त्याचे सहकारी तसेच वैशाली चव्हाण यांनी अथक परिश्रमातून मांजरीच्या पिल्लाची सुटका केली. पिल्लू किरकोळ जखमी होते. मात्र, प्रथमोपचार दिल्यानंतर ती व्यवस्थित होईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. पिल्लाला सुखरूप बाहेर काढल्याने समाधान व आनंद झाल्याचे प्राणीमित्रांनी सांगितले.