दीपक गायकवाड
खोडाळा (पालघर) : मोखाडा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आणि परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन गरजांचे केंद्र असलेल्या खोडाळा गावात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून राबवण्यात आलेली 'जलजीवन मिशन' योजना केवळ कागदोपत्रीच यशस्वी ठरताना दिसत असून, प्रत्यक्षात मात्र खोडाळावासीयांच्या नशिबी गाळमिश्रित आणि दुर्गंधीयुक्त पाणी आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांच्या ढोबळ उत्तरांमुळे ही योजना पाईपातच अडकली असून, यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.
खोडाळा येथील जलशुद्धीकरण केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे स्थानिक तलावाने तळ गाठला असून, ग्रामस्थांना विहिरीतून किंवा नळावाटे गाळमिश्रित पाणी प्यावे लागत आहे. या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे गावात पोटाचे विकार आणि त्वचेच्या रोगांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्थानिक रहिवाशांबरोबरच बाजारपेठेत येणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांनाही या भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशुद्ध पाण्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींनी आता गंभीर स्वरूप धारण केले असून, ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र असंतोष पसरला आहे.
ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी नुकतीच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी येत्या आठ दिवसांत परिस्थिती सुधारण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेली होती. मात्र, या आश्वासनाला आता दोन आठवडे उलटून गेले तरी जमिनीवर कोणतीही हालचाल झालेली नाही. लोकप्रतिनिधींच्या सूचनांनाही अधिकारी जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या कामात नेमका अडथळा काय, याची विचारणा केली असता प्रशासनाकडून मिळणारी उत्तरे हास्यास्पद आहेत. संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधींनी 'पाईपलाईन खोदण्यासाठी जेसीबी मिळत नाही' असे बालिश उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकली आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता सुरेश पवार यांनी संबंधित एजन्सीकडे बोट दाखवत हात झटकले आहेत. या योजनेचा महत्त्वाचा दुवा असलेले निवृत्त अधिकारी नीरभवणे यांनी 'एचडीपीई पाईप' उपलब्ध नसल्याचे तांत्रिक कारण पुढे केले आहे. मात्र, सोमवारी २० एप्रिलपासून काम सुरू करू, असा नवा वायदा त्यांनी केला आहे.
एकूणच व्यवस्थेचा विचार करता, खोडाळा येथील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचे गांभीर्य प्रशासनाला नसल्याचे उघड झाले आहे. तांत्रिक अडचणी आणि साहित्याची कमतरता ही केवळ वेळ काढूपणाची लक्षणे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जर २० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर खोडाळ्यातील अशुद्ध पाण्याचा हा मुद्दा तीव्र जनआंदोलनाचे रूप घेण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.