खानिवडे : मुंबई दिल्ली महामार्ग क्रमांक ४८ वरील खानिवडे टोलवर स्थानिक टेम्पो चालकांकडून घेण्यात येणाऱ्या टोल मुळे त्यांनी रस्ता रोको ची हाक दिली होती. मात्र त्या अगोदरच टोल प्रशासन आणि आंदोलक यांच्या मध्ये पोलिसांनी मध्यस्ती करून करण्यात आलेल्या बैठकीनंतर टोल प्रशासनाने ५०% सवलत देण्याची कबुली दिली आहे.मात्र टेम्पो चालक व भाकप यांनी स्थानिकांना पूर्ण टोल माफ करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
स्थानिक टेम्पो चालक-मालकांकडून खानिवडे टोल नाक्यावर अनावश्यक व भरमसाठ टोल वसुली होत असल्याच्या नाराजीने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने रस्ता रोको आंदोलन हाक दिली होती. या आंदोलनापूर्वी प्रशासनाने दखल घेत मध्यस्थी करत पोलिस प्रशासन आणि टोल प्लाझा अधिकार्यांची बुधवारी मांडवी पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली होती.
बैठकीला मांडवी पोलीस निरीक्षक रंणजित आंधळे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पालघर जिल्हा कौंसिल सदस्य काॅ. शेरू वाघ, वसई तालुका सह-सचिव काॅ. अंकुश खरपडे शिरसाट, विभाग सचिव काॅ. जयेश कुडु, लाल बावटा (टेम्पो चालक-मालक संघटना अध्यक्ष), काॅ. सौरभ ठाकरे (उपाध्यक्ष), काॅ. सोहेल शेख (खजिनदार), काॅ. सचिन शर्मा तसेच टोल प्लाझा व पोलीस प्रशासनाचे संबंधित अधिकार्यांनी सहभाग घेतला.
बैठकीदरम्यान स्थानिक चालक-मालकांचा तक्रार विषय खूप गंभीर मानण्यात आला आणि टोल प्लाझा प्रशासनाने स्थानिक टेम्पो चालक-मालकांना ५० टक्के टोल सवलत देण्याची कबुली दिली. भाकपाच्या प्रयत्नांमुळे हा निर्णय मिळाला असल्याचे काॅ. शेरू वाघ यांनी सांगितले.
लाल बावटा नेतृत्वाखालील टेम्पो चालक-मालक संघटनेने मात्र टोल पूर्णपणे माफ करणे ही मागणी अजून कायम ठेवली असून यावर ठामपणे लढा देण्याचा मोठा लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.