पालघर : मतांची चोरी आणि दरोडेखोरी करून महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. मतांची चोरी केल्याशिवाय भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या आमदारांची निवडून यायची लायकी नाही. ते निवडून येऊच शकत नाही. शिवसेनेला तुझ्या बापाने जन्म दिला आहे का? अशी जहरी टीका एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत शुक्रवारी पालघर तालुक्यातील माकणे गावात आले होते. माकणे गावातील पंडित पाडा येथील शाखेचे उद्घाटन केल्यानंतर शिवसैनिकांना संबोधित केले.
शिवसेनेचा बाप एकच आणि ते म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असे ठाम प्रतिपादन केले. बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेली शिवसेनाच खरी शिव सेना असेही सांगितले. शिंदेची शिवसेनना खरी असल्याचा दावा करणाऱ्या मिंधे गटाने शिवसेनेच्या जन्माचा दाखला घेऊन यावे असे आव्हान दिले. तुमचा बाप अमित शहा असल्याचे सांगत यामुळे तुम्ही बिन बापाचे असल्याची टीका केली.
जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शिवसेने सोबत आहे, तोपर्यंत शिवसेनेचा कोणी बालही कोणी बाका करू शकत नाही, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेने पालघर मधून अनेक नेते तयार केले, वैयक्तिक स्वार्थासाठी अन्य पक्षात गेले. किती आले आणि किती गेले परंतु शिवसेना संपली नाही. शिवसेनेचा संघर्षाचा काळ सुरु आहे. परंतु परिस्थितीत बदल नक्की होणार असा विश्वास व्यक्त केला.
वाहतूककोंडीवर बोलताना वाहतूककोंडीची समस्या पालघरच्या नागरिकांच्या पाचवीला पूजली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून एकदा तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यायला पाहिजे. गृहमंत्री अमित शहा आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हेलिकॉप्टर सोडून रस्त्याने प्रवास केल्यास लोकांचे हाल त्यांना अनुभवता येतील.
काहीजन वैयक्तिक स्वार्थासाठी इतर पक्षात गेले
पालघर दौऱ्याबाबत बोलताना संघटनात्मक बांधणीसाठी पालघर मध्ये आलो असुन शाखा निर्माण झालेल्या भागात शिवसेना वाढत असते. त्यामुळे प्रत्येक गावात शाखा निर्माण केल्या जातील. पालघर मधील शिवसेनेचा मतदार आणि कार्यकर्ता जागेवर आहेत. काही जन वैयक्तिक स्वार्थासाठी इतर पक्षात गेले आहेत. परंपरागत मतदार सोबत आहेत त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती दिली.
मुंबई-अहमदाबाद महामार्गवरील वाहतूक कोंडीच्या शक्यतेमुळे मुंबई ते सफाळे पर्यंत लोकलने प्रवास करीत साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सफाळे रेल्वे स्थानकात दाखल झाले. खासदार संजय राऊत यांच्या सोबत पालघर जिल्हा संपर्क प्रमुख विलास पोतनीस, यंत्रणा प्रमुख अमोल कीर्तिकर आणि मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.