Jawhar छायाचित्रे : मच्छिंद्र आगिवले
पालघर

Jawhar Waterfalls | कोकणचा महाबळेश्वर' 'जव्हारची जादू' धबधबे पाहताच पडेल भुरळ

नैसर्गिक पर्यटनासाठी जव्हारला यायलाच लागतय

पुढारी वृत्तसेवा

प्राकृतिक संपन्नता, सुंदरता आणि आदिवासी कला संस्कृती व दीर्घकाळ आदिवासी राजवट लाभलेला असा हा संस्थानकालीन जव्हार तालुका. येथे निसर्गाने देखील मुक्त हस्ताने रंगांची उधळण करीत भर घालून येथील सृष्टी सौंदर्य खुलविले आहे. पावसाळ्यात ऐतिहासिक व निसर्गरम्य अशा ठिकाणी, नजर पोहोचेपर्यंत दाट हिरवळ, थंडगार हवा, सोसाट्याचा वारा यामुळे अंग ओलेचिंब भिजून शहारे येतात. हे अनुभवताना पर्यटकांना निसर्गनिर्मित धबधबे पाहण्यासाठी हिरवाईने नटलेल्या जव्हारची भुरळ पडत आहे.

मुंबई पासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेले जव्हार हे प्रसिद्ध असे निसर्गनिर्मित पर्यटनस्थळ. या भागात पर्यटक आल्यानंतर येथील स्थानिक व रुचकर आणि कसदार पदार्थ नाचणीची भाकरी, उडदाचा भुजा आणि मिरचीचा ठेचा, गावठी कोंबडा आणि या भागातील डोंगरदऱ्यांत निसर्गतः उगवत असलेली रान भाजी, की ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रुचकर अशी चव आणि आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारे सर्व घटक यामुळे या ठिकाणी पर्यटक सुखावत आहे. धबधबा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचे प्रतीक, जव्हारला धबधब्यांच्या तालुका म्हंटले जाते. मुंबई ते ठाणे शहरांपासून जव्हारच्या दिशेने येत असताना उंच-उंच टेकड्यावरून छोटे छोटे पांढरे शुभ्र रंगात फेसाळलेले धबधबे पाहायला मिळतात. शिवाय, रस्त्याच्या कडेला या भागात उपलब्ध होत असलेले गोड्या पाण्यातील मासे, खेकडे घेऊन या भागातील आदिवासी बांधव विक्री करीत असल्याने पर्यटकांना या सगळ्यांची चव चाखण्याची एक वेगळी अनुभूती मिळते.

आज राज्यात जे प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत तेथील परिस्थिती पाहता प्रचंड कोंडी राहण्याखाण्याच्या सुखसोयी बद्दल देखील अनेकदा मोठ्या प्रमाणावर आबाळ झाल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. या पार्श्वभूमीवर जव्हार सध्या विकसित होत आहे, दाभोसा येथे खूपच सुंदर असा काचेचा स्कायवॉक देखील येथील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी बांधण्यात आलेला आहे. तर कासट वाडी येथे zip line देखील तयार करण्यात आले आहे शिवाय अनेक पर्यटन स्थळावर पर्यटकांची काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय या भागात कुठेही ट्रॅफिक जाम होत नाही सुटसुटीत सगळी पर्यटन स्थळे असल्याकारणाने कुठेही गर्दी होऊन गालबोट देखील लागत नाही. फक्त काही ठिकाणांवर काळजी घेणे तेवढे आवश्यक आहे यामुळे खऱ्या नैसर्गिक पर्यटनांचा आनंद घेण्यासाठी जव्हार हे ठिकाण सध्यातरी सर्वात सुरक्षित आणि आनंददायी आहे.

दाभोसा धबधब : जव्हार शहरापासून सेलवास रस्त्याला १७ कि.मी. अंतरावर असलेले सुप्रसिद्ध असे नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणजे दाभोसा धबधबा. या धबधब्याचा नजारा पाहण्यासाठी पर्यटक आतुर झाला असून येथे झुंबड उडाली असून ठाणे, गुजरात, नाशिक, सेलवास, अश्या महानगरातून पर्यटक दाखल होत आहेत.

हिरडपाडा धबधबा : जव्हार शहरापासून सुमारे १३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात खूप मोठा व उंचावरून पांढऱ्या शुभ्र पाण्याने फेसळणारा विलोभनीय असा धबधबा आहे. हा धबधबा नजरेआड असल्याने येथे जायला सुयोग्य व्यवस्था नव्हती परंतु या भागातील सोयी सुविधा वाढत आहेत. हा धबधबा लेंडी नदी वरून पडतो.

काळमांडवी धबधबा : जव्हार शहरापासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या केळीचा पाडा या गावातून ३ किमी अंतरावर गेल्यावर काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते, काळशेती नदीवरून हा धबधबा वाहत असल्याने काळमांडवी हे नाव पडले असल्याचे जुने जाणकार सांगतात. अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यंदा मात्र या ठिकाणी जाण्यास प्रशासनाच्या वतीने धारा १४४ लागू केली आहे.

खडखड धरण: जव्हार शहरापासून साधारण सहा किलोमीटर अंतरावर खडखड धरण आहे.

भूपतगड किल्ला : हा जव्हार राज्याची पहिली राजधानी होती. त्यामुळे या किल्ल्याने खूप काळ राजवैभव पाहिले आहे. जव्हार संस्थान हे ठाणे जिल्ह्यात असून तेथे पोहोचण्यासाठी अनेक मार्ग असून त्यांतील दोन मार्ग प्रचलित आहेत. एक म्हणजे कल्याण-कसारा विहीगाव मोखाडा-जव्हार हा मार्ग, तर दुसरा ठाणे जिल्ह्यातून कल्याण-भिवंडी वाडा विक्रमगड - जव्हार असा मार्ग. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातीलच कुर्लोट गावामार्गेही वाट आहे. मात्र ही वाट खडी चढाईची आहे. जव्हारवरून चोथ्याची वाडी, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत माणूस १६ किलोमीटरवरील झाप गावात येऊन दाखल होतो. जव्हारहून झापला दर तासाभराने एस.टी.ची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत इथे किल्ला असल्याचे जाणवत नाही. जव्हार परिसरातील डोंगररचना अतिशय क्लिष्ट आहे.

जव्हारमधील सनसेट पॉईंट हे एक सुंदर आणि शांत पर्यटन ठिकाण आहे, जिथून सूर्यास्ताचा सुंदर नजराणा, हिरवीगार खोरी आणि धनुष्याकृती दरी दिसते. मुख्य वैशिष्ट्येसूर्यास्ताचे दृश्यः संथ वातावरणात डॉगच्या वेळी (संध्याकाळी) आकाशात दिसणारे केशरी आणि लाल रंगांचे सुंदर छटा. जुने नावः या ठिकाणाला आधी 'धनुषकमल' म्हटले जायचे कारण येथील दरी धनुष्यासारखी दिसते. इतर आकर्षणेः लहान मुलांसाठी खेळणी असलेला पार्क, फिरण्यासाठी पादचारी मार्ग (वॉकम वे) आणि जवळच ग्रामदैवत मंदिर आहे.

नेकलेस पॉईंट : तालुक्यातील झाप या ग्रामपंचायत अंतर्गत हा पॉईंट सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे ग्राम पंचायतच्या उत्पन्नातून खर्च करून बैठक व्यवस्थेसह पावसाळ्यात पर्यटकांना डोंगरावरून नागमोडी नदीचे नयन दृश्य बघायला मिळत आहे या ठिकाणी सेल्फी पॉइंट टॉवर रेलिंग नेम बोर्ड संरक्षण भिंत अशा अनेक सुविधा देखील करून दिलेल्या आहेत.

कोरतोबा देव : जव्हार तालुक्यातील अतिशय जागरूक आद्य ग्रामदैवत म्हणून कोरतोबा देवस्थानाकडे पाहिले जाते. जव्हार पासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर कोरतड ग्रामपंचायत मध्ये हे जुनं ऐतिहासिक मंदिर आहे. या ग्रामदैवतावर येथील लोकांची मोठी श्रद्धा आहे. या ठिकाणी देखील पर्यटक जाऊन येथील परंपरा जाणून घेऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT