पालघर : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या भ्रष्ट कारभारामुळे चर्चेत आहे. यामुळे आता येथील अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची मागणी होत असताना या कार्यालयाचा आता नवा घोटाळा उघडकीस आला आहे. जव्हार तालुक्यातील खडखड, कुंडाचापाडा आपटाळे केळीचापाडा अळीवमाळ अखर साकुर या रस्त्यावर विविध लांबीच्या चेंनेज नंबरची तब्बल 6 ते 8 कोटी कामे आहेत.
काही कामे पूर्ण झाल्याचे आणि काही कामे चालू असल्याचे कागदोपत्री दाखवून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर मध्ये यातील 5 कोटींच्या आसपास बिले संबंधित ठेकेदारांना अदा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काम हे 2 कोटी रुपयांचे देखील झाले नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे कही दिवसापूर्वीच माजी आमदार सुनील भुसारा यांनी याबाबत तक्रार केली. यानंतर मात्र संबंधित ठेकेदारांकडून ही कामे उरकण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
ज्या कामांचा निधी सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात काढण्यात आला ती कामे मात्र आता डिसेंबर मध्ये करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर आता कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
यावरुन जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचारी कारभारामुळे आता समोर आला आहे. जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारांची डिपॉझिट अनधिकृत रित्या काढण्याचा एक प्रकार समोर आल्यानंतर हे कार्यालय आपल्या भ्रष्ट कारभारामुळे प्रकाश झोतात आले तर आता या कार्यालयाचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. जव्हार तालुक्यातील खडखड साकुर, कुंडाचा पाडा, आपटाळे,केळीचापाडा,आळीव माळ,आखर ते साकुर या संपूर्ण रस्त्यासाठी शासनाकडून सहा ते आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.
यामुळे हे काम बिले अदा होण्याच्या अगोदरच होणे अपेक्षित होते.मात्र ही काम रखडल्याने येथील नागरिकांना अनेकदा मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.मात्र जेव्हा प्रत्यक्षात याबाबतची माहिती घेतली असता या कामांची बिल सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यातच काढल्याचे समोर आले यामध्ये काही काम चालू कामे दाखवून ही बिले काढण्यात आली.
मात्र ही रक्कम देताना एकूण कामाच्या जेवढे काम केले आहे तेवढीच देणे अपेक्षित असताना काही लांबीमध्ये शून्य काम असताना सुद्धा तब्बल 90% जास्त ही रक्कम संबंधित ठेकेदाराला वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला यानंतर माजी आमदार सुनील भुसारा यांनी याबाबतची तक्रार केली तसेच याबाबत सत्य सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमातून प्रसारित केल्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची धावपळ उडाली.
यामुळे संबंधित रस्त्यावर सध्या डांबर टाकण्याचे काम जोरदार सुरू असल्याचे दिसून येत आहे.मात्र शासनाने गेल्या दोन अधिवेशनात बजेट मांडलेले नाही. नवीन कोणत्याही कामांना मंजुरी नाही. मग नेमके हे कोणते काम होते जे आता बांधकाम विभागाने सुरू केले असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक देखील विचारू लागली आहेत यामुळे जर या कामांच्या काढलेल्या निधी संदर्भात चर्चा झाली नसती किंवा याबाबतच्या तक्रारी आल्या नसत्या तर ही सर्व कामे न करता ठेकेदार आम्ही अधिकारी यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाला असता नव्हे तो झाला देखील आहे.
यामुळे ही कामे जरी आज घडीला सुरू असतील मात्र कामे न करताच यांची बिले दोन ते तीन महिने अगोदर कशी अदा करण्यात आली याची आता उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे असून यातील संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाची देखील कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा असंख्य भ्रष्टाचाराचे माहेरघर असलेल्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेल्या काही वर्षातील कारभाराचा तपास केल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
असे प्रकार सर्रास होतात
शासनाकडून आलेला निधी मार्च महिन्याच्या अखेर खर्च करावयाचा असल्याने अनेकदा अशा कामांच्या ठिकाणी काही जुजबी सामान जसं की खडी, दगड रेती असे साहित्य लिहून टाकले जाते. बांधकाम विभागाच्या भाषेत रनिंग बिलाच्या नावाखाली कामांची तब्बल 80 ते 90 टक्के रक्कम काढली जाते आणि जर भविष्यात या कामाची काही चौकशी किंवा त्या संदर्भात तक्रारी आल्या तरच हे काम ठेकेदाराकडून करून घेण्यात येते अन्यथा त्यावर्षीचा तो निधी त्याच पद्धतीने हडप केला जातो. त्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा त्याच रस्त्यांच्या नावाने काम मंजूर करण्यात येतात किंवा मग जिल्हा परिषदेच्या निधीतून अशी कामे केली जातात.असे प्रकार याआधी सुद्धा सर्रास घडल्याची आता चर्चा या भागात सुरू आहे. यामुळे येथील विकास कामांच्या बाबतीत नेहमीच नाराजी व्यक्त करीत असलेले पालकमंत्री गणेश नाईक यांनी या कामांची सुद्धा चौकशी लावणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
“आम्ही त्या कामांची आर.ए(चालू बिले)बिले दिलेली आहेत.काम बघूनच ती रक्कम देण्यात आलेली आहे. चालू कामांची बीले देण्यात आली होती. याशिवाय राहिलेली कामे सुद्धा आज घडीला पूर्ण होत आहेत.अमित पाटील, उप अभियंता,सा.बा विभाग जव्हार.