जव्हार : जव्हार तालुक्यातील झाप 77 महामार्गावरील पोंढीचापाडा पुलाची उंची वाढवावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र प्रशासन केवळ टोलवाटोलविचे उत्तरे देत तांत्रिक अडचणी सांगत या वर्षी देखिल त्या भागातील ग्रामस्थ, कर्मचार्यांना तासूनतास पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागत आहे.
ह्या पुलाचे बांधकाम होवून पुलाची उंची वाढवावी म्हणून त्या भागातील ग्रामस्थ दरवर्षी जनता दरबार असो, की सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदने देऊनही पुलाची परिस्थिती कायम आहे. आजही त्या भागातील ग्रामस्थ, कर्मचार्यांना पुलावरील पाणी आटण्याची वाट पहावी लागत आहे.
झापकडे जाताना पोंढीचापाडा पुलाच्या कमी उंचीमुळे या वर्षी देखील संपूर्ण पूल पाण्याखाली गेला आहे. म्हणून त्या भागातील गावं झाप, कौलाळे, फणसपाडा, पवारपाडा वाडा येथे जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. यावरून एसटी बस शिवाय अन्य वाहनांची रोजच ये-जा सुरू असते, ती वाहतूक बंद झाली आहे. तसेच त्या भागात 5 ग्रामपंचायती 1 प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 आरोग्य पथके, 2 आश्रमशाळा 35 जिल्हा परिषद शाळांचे मार्ग बंद झाल्याने शिक्षकांना देखील अडचण निर्माण झाली आहे. तसेच या भागातील ग्रामस्थांना पर्यायी रस्ता नसल्याने येथील नागरिकांना दरवर्षी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये तालुक्याला येणार्या रुग्णांचे देखील हाल झाले आहेत. याकडे आतातरी शासनाने लक्ष घालून कारवाई करावी अशी मागणी त्या भागातील ग्रामस्थ करीत आहेत.
पाऊस सुरू झाला की पोढींचापाडा नदीवरील पूल पाण्याखाली जातो की काय? म्हणून त्या भागातील ग्रामस्थांना चिंता वाटते, जव्हार ह्या शहराच्या ठिकाणी जावू की नको या चिंतेत झाप भागातील ग्रामस्थ असतात. जर का जव्हारला गेलो तर त्या पुलावर येऊन वाट पहावी लागेल म्हणून पाऊस सुरू झाला की तालुक्याच्या ठिकाणी जाणे हे ग्रामस्थ टाळत आहेत. कारण पुन्हा यायला किती उशीर होईल हे नक्की नसते, कारण यापूर्वी अनेक ग्रामस्थांना तासंतास पुलावरील पाणी कमी होण्याची वाट पहावी लागली होती. म्हणून जोराचा पाऊस सुरू झाला की त्या भागातील चिंता राहते ती पूल पाण्याखाली जाण्याची यामध्ये शाळकरी व कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांची जास्तच हालत होते, म्हणून याकडे आतातरी शासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे.
झाप भागातील प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार कार्यालय, गटविकास अधिकारी, जिल्हा अधिकारी यांना पोंढीचापाडा येथील नदीवरील पुलाच्या बाबत निवेदन दिले आहे. परंतु दरवर्षी निवेदने देऊनही काहीही उपाययोजना झाली नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. पुढील वर्षी तरी शासनाने लक्ष घालून त्या पुलाची उंची वाढवावी की नव्याने पुलांचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी त्या भागातील ग्रामस्थांची आहे.
पोंढीचापाडा पूलाची उंची वाढावी म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून मागणी केली जात आहे. परंतु सरकारच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना पाऊस सुरू झाला की जव्हार येथे जाऊ की नको, अशी चिंता राहते, हे दरवर्षीच कारण आहे. पायाभूत सुविधा तरी मिळाव्या अशी मागणी आमची ग्रामस्थांची आहे.एकनाथ दरोडा, सरपंच झाप.