Jal Jeevan Mission: डहाणूत ‘हर घर जल’चा फोल गाजावाजा; टाक्या उभ्या पण नळ कोरडेच Pudhari
पालघर

Jal Jeevan Mission: डहाणूत ‘हर घर जल’चा फोल गाजावाजा; टाक्या उभ्या पण नळ कोरडेच

जल जीवन मिशनची कामे अर्धवट; महिलांना अजूनही पाण्यासाठी वणवण

पुढारी वृत्तसेवा

कासा : निलेश कासट

केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना डहाणू तालुक्यात अक्षरशः कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र समोर येत आहे. “हर घर जल”चा नारा देत मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या; मात्र अनेक गावांत आजही नळ कोरडेच असून घरापर्यंत पाणी पोहोचलेले नाही.

खेड्यापाड्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून हजारो कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या निधीतून टाक्या, विहिरी आणि पाईपलाईनची कामे हाती घेण्यात आली. काही मोजक्या गावांमध्ये योजना यशस्वी ठरली असली तरी बहुसंख्य गावांमध्ये केवळ टाक्यांचे बांधकाम करून काम अर्धवट सोडल्याचे वास्तव आहे.

तालुक्यातील अनेक पाड्यांमध्ये पाईपलाईनच टाकण्यात आलेली नाही, तर काही ठिकाणी अर्धवट अवस्थेतच काम थांबले आहे. काही टाक्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. नव्याने खोदलेल्या विहिरींचीही गुणवत्ता संशयास्पद असल्याचे ग्रामस्थ सांगतात. काही ठिकाणी जुन्याच विहिरींवर अवलंबून राहून योजना राबवली जात असल्याने अपेक्षित पाणीपुरवठा होत नाही.

“महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा उतरवणार” अशी घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात महिलांनाच अजूनही लांबवरून पाणी आणावे लागत आहे. पाच-सहा वर्षे उलटूनही नळातून पाणी मिळाले नाही, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “नळ बसवले, टाक्या उभारल्या; पण पाणी कधी येणार?” असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, “योजना लवकरच पूर्ण होईल आणि सर्वांना पाणीपुरवठा सुरू केला जाईल,” असे आश्वासन देण्यात येत आहे. दुसरीकडे, ठेकेदार मात्र निधीअभावी कामे रखडल्याचे सांगत आहेत.

जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना तालुक्यासह जिल्ह्यात निष्फळ ठरत असल्याचे दिसते, काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्ध स्रोत आहेत तिथून पाणी देण्यात आले आहे. टाक्याचे निकृष्ट बांधकाम केले असून या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा मोठा संशय आहे. =
अशोक भोईर,सामाजिक कार्यकर्ते डहाणू

एकीकडे योजनेचा गाजावाजा आणि दुसरीकडे अपूर्ण कामेया विसंगतीमुळे जल जीवन मिशनचा डहाणू तालुक्यात बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसत आहे. नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष नळातून पाणी कधी येणार, याचीच प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT